Aurangabad Municipal Corporation Election 2022: 'बायको पाहिजे बायको! जातीची अट नाही' औरंगाबाद येथे उमेदवारीसाठी उतावीळ तरुणाची बॅनरबाजी
विशेष म्हणजे हा इसम विवाहीत असून त्याला अपत्येही आहेत. त्याच्या या बॅनरबाजीची औरंगाबाद (Aurangabad) शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
महापालिका निवडणुकीत (Municipal Corporation Elections) उमेदवारी करण्यासाठी उतावीळ असलेल्या एका तरुणाने चक्क 'बायको पाहिजे' (Bayko Havi Banners in Auragnabad) ) अशा शिर्षकाखाली बॅनरबाजी केली आहे. विशेष म्हणजे हा इसम विवाहीत असून त्याला अपत्येही आहेत. त्याच्या या बॅनरबाजीची औरंगाबाद (Aurangabad) शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याचे हे काहीसे विचित्र वाटावे असे बॅनर सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक 2022 तोंडावर आली आहे. त्यामुळे शहरातील सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. त्यामुळे शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात या उतावळी गृहस्थाचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
रमेश पाटील (Ramesh Patil) असे बॅनरबाजी करणाऱ्या या गृहस्थाचे नाव आहे. हा गृहस्थ औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे. पण रमेश पाटील यांचा विवाह झाला असून, त्यांना तीन अपत्ये आहेत. त्यामुळे ते आणि त्यांची पत्नीही निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकत नाहीत. त्यामुळे रमेश पाटील यांच्या डोक्यात एक 'आयडीयाची कल्पना' आली. त्यांनी चक्क शहरात 'निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे' बॅनर लावले. (हेही वाचा, Boring Jobs : शाब्बास रे पठ्ठ्या! नोकरीला कंटाळला, थेट कंपनीवरच दावा ठोकला; मिळवले 33 लाख)
बॅनरमध्ये काय म्हटले?
'औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक 2022... मला तीन मुले असल्याकाराने मी निवडणूक लढवू शकत नसल्याने निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे (जातीची अट नाही)'. वय वर्ष 25 ते 40, अविवाहित / विधवा / घटस्फोटीत चालेल. फक्त 2 अपत्य (मुले) पेक्षा जास्त असणारी चालणार नाही'.
औरंगाबाद शहरातील गुलमंडी येथे हा बॅनर लावण्यात आला आहे. शहरातील नागरिकांचे हा बॅनर लक्ष वेधून घेत आहे. काही मंडळी या बॅनरचा फोटो काढून सोशल मीडियात व्हायरल करत आहे. एकूणच काय तर उमेदवारीसाठी उतावीळ असलेल्या रमेश पाटील यांची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे.