Assam मधील कलाकाराने एक्सपायर्ड औषधांच्या 40 हजार स्ट्रिप्सपासून साकारली दुर्गा मातेची अनोखी मुर्ती (See Pics)
या संकट काळात अनेक नकारात्मक गोष्टी पाहायला मिळाल्या. परंतु, काही चांगल्या, सकारात्मक घटनाही समोर आल्या.
कोरोना व्हायरस संकटाचा गेली 6-7 महिने संपूर्ण देश सामना करत आहोत. या संकट काळात अनेक नकारात्मक गोष्टी पाहायला मिळाल्या. परंतु, काही चांगल्या, सकारात्मक घटनाही समोर आल्या. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करत अनेकांनी आपल्या क्रिएटीव्हीटला चालना दिली. अशीच एक घटना आसाममधून समोर येत आहे. आसाम मधील एका 37 वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याने एक्सपायर्ड औषधांपासून दुर्गा मातेची मुर्ती साकारली आहे. यासाठी त्याने एक्सपायर्ड टॅबलेट्स, कॅप्सुल आणि इंजेक्शनचा वापर केला आहे. ही मुर्ती साकारण्यासाठी याला 5 महिन्यांचा कालावधी लागला.
संजीब बसाक असे या कलाकाराचे नाव असून तो धुबरी जिल्हा प्रशासनाचा कर्मचारी आहे. संजीव, गेल्या अनेक वर्षांपासून मुर्ती नाविण्यपूर्ण कल्पनेतून दुर्गा मातेची मुर्ती साकारत आहे. त्याचबरोबर मुर्ती पर्यावरणस्नेही असावी याकडेही त्याचा कल असतो. यंदा कोविड-19 च्या संकाटात काहीतरी अनोखे साकारण्याचा त्यांचा विचार होता. म्हणून त्यांनी चक्क एक्सपायर्ड झालेल्या औषधांचा वापर करत दुर्गेची सुंदर मुर्ती साकारली आहे.
संजीब बसाक यांनी सांगितले की, "लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात आवश्यक औषधे खरेदी करण्यासाठी लोकांनी औषधांच्या दुकानाबाहेर रांगा लावल्या होत्या. त्यातूनच मला औषधं, गोळ्या यांच्य स्ट्रीपपासून मुर्ती साकारण्याची कल्पना सुचली. गेल्या वर्षी बसाक यांनी खराब झालेल्या विद्युत केबल्समधून दुर्गेची मुर्ती साकारली होती."
ANI Tweet:
आपली कल्पना सत्यात उतरवण्यासाठी या कलाकाराल तब्बल 5 महिने लागले. विविध रंगांचे 40,000 औषधांच्या स्ट्रिप्स, कॅप्सुल आणि इंजेक्शन यांचा वापर करुनही मुर्ती साकारण्यात आली आहे. कामाचा ताण आणि लॉकडाऊन यामुळे यंदाच्या वर्षी दुर्गेची मुर्ती साकारता येईल का, याची मला सुरुवातीला चिंता होती. परंतु, आता इच्छापूर्ती झाली आहे. कागद, थर्मोकॉल, बोर्ड आणि इतर गोष्टींशिवाय केवळ औषधांच्या स्ट्रिप्सचा वापर करुन ही मुर्ती साकारली असल्याचे बसाक यांनी सांगितले.