राज ठाकरेंच्या व्यंगचित्रावर आक्षेपार्ह कमेंट्स ; तरुणाला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण
आक्षेपार्ह कमेंट्स करणाऱ्या तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रावर आक्षेपार्ह कमेंट्स करणाऱ्या तरुणाला चोप दिल्याची घटना बदलापूर येथे घडली आहे. हा तरुण सातत्याने राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रावर सातत्याने आक्षेपार्ह कमेंट करत असल्याचा दावा मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी, अमित शाह हे वर्गाबाहेरचे विद्यार्थी; राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून टोला
काय झाले नेमके ?
राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रावर एक युवक फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह कमेंट्स करत होता. त्यामुळे मनसे महिला कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. या मारहाण करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांच्या या कामगिरीचे ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कौतुक केले आहे.
कोण आहे तो तरुण ?
विवेक भागवत असे या तरुणाचे नाव असून तो बदलापूर येथे राहतो. तो राज ठाकरेंच्या व्यंगचित्रावर नेहमी विरोधात आणि अपशब्द वापरुन कमेंट करत असल्याचे मनसे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मनसेच्या महिला कार्यकर्त्या दुपारी या तरुणाच्या घरी गेल्या आणि त्याला मारहाण केली.
माफी आणि कबुली
दमबाजी करत त्याला माफी मागायला लावली. या सर्व प्रकरणाचे व्हिडिओ शूटही करण्यात आले. त्याचबरोबर सोशल मीडिया अकाऊंट बंद करेन, अशी बळजबरी त्याच्याकडून कबुलीही घेतली. इतकंच नाही तर अकाऊंट बंद करण्याअगोदर तशी पोस्ट करण्यासही सांगितले.