'महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत'; मुंबईच्या वसतिगृहातील मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्येवर MP Supriya Sule यांची प्रतिक्रिया

पोलिसांना त्याचा मृतदेह चर्नी रोड रेल्वे ट्रॅकजवळ सापडला. प्रकाश कनोजिया असे आरोपीचे नाव असून, तो त्याच वसतिगृहात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता.

Supriya Sule | (Photo Credits: ANI/ Twitter)

मुंबईतील (Mumbai) मरीन लाइन्समध्ये 18 वर्षीय तरुणीवर झालेला बलात्कार (Rape) आणि हत्येची महाराष्ट्र सरकारने सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. घटनेवर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, अशा घटनांमुळे राज्यात महिला असुरक्षित असल्याचे दिसून येते. मुंबईतील चर्चगेट परिसरातील गर्ल्स हॉस्टेलमध्ये 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला होता. तिच्या खोलीला बाहेरून कुलूप होते आणि गळ्यात स्कार्फ बांधलेल्या अवस्थेत ती मृतावस्थेत आढळली होती. बलात्कारानंतर तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील महिला वसतिगृहात एका तरुणीचा मृतदेह आढळला. तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. ही अतिशय गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे.अशा घटनांतून महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत हेच सातत्याने अधोरेखित होत आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलीस भावपूर्ण श्रद्धांजली. राज्य शासनाने या प्रकरणी कसून चौकशी करणे गरजेचे आहे. मुलींच्या वसतिगृहात जाऊन तिची हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारा़ची मजल जाते ही निश्चितच महाराष्ट्राला शोभणारी बाब नाही.’

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, ‘वसतिगृहांमध्ये सुरक्षा व्यवस्था असणे आवश्यक आहे. सरकारने वसतिगृहात सीसीटीव्ही कॅमेरे आणि धोक्याची घंटा बसवावी आणि हेल्पलाइन क्रमांकही लावले पाहिजेत.’ मरीन ड्राईव्हवरील पोलीस जिमखान्याजवळ असलेल्या राज्य सरकारच्या सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात 18 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. मुलगी मुंबईच्या कॉलेजमध्ये शिकत होती आणि ती अर्धवेळ नोकरी करत होती. ती वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर राहत होती. (हेही वाचा: Thane Crime: सहा वर्षांच्या चिमूकलीवर लैंगिक अत्याचार, ठाणे पोलिसांकडून 45 वर्षीय इसमास अटक)

दरम्यान, या तरुणीच्या कथित हत्येप्रकरणी फरार असलेल्या संशयित आरोपीने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांना त्याचा मृतदेह चर्नी रोड रेल्वे ट्रॅकजवळ सापडला. प्रकाश कनोजिया असे आरोपीचे नाव असून, तो त्याच वसतिगृहात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला होता.