Pune Road Accident: पुणे-सातारा रोडवरील नातूबाग परिसरात PMPML बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू; एक जण जखमी

या अपघातात आशाबाईंना गंभीर दुखापत झाली. त्यांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

PMPML bus प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - फेसबुक)

Pune Road Accident: पुण्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. पुणे-सातारा रोडवरील (Pune- Satara Road) नातूबाग परिसरात (Natu Baug Area) लग्न आटोपून घरी परतत असताना एका 57 वर्षीय महिलेला भरधाव पीएमपीएमएल बसने (PMPML Bus) धडक दिली. आशाबाई दत्तात्रय साळुंके असं या मृत महिलेचं नाव आहे. आशाबाई यांच्यासोबत असलेली त्यांची नात प्रचितीला या अपघातात (Accident) गंभीर दुखापत झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शुक्रवार पेठ, टिळक रोड येथे राहणाऱ्या आशाबाई साळुंके या शनिवारी रात्री 23 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मुलगी आणि नातीसोबत रस्ता ओलांडत होत्या. रस्त्या ओलांडत असताना सतीश राजाराम गोरे या पीएमपीएमएल बस चालकाने आशाबाई आणि प्रचिती या दोघींना धडक दिली. या अपघातात आशाबाईंना गंभीर दुखापत झाली. त्यांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. (हेही वाचा - Raigad Car Accident: रायगड मध्ये कार कठडा तोडून नदीत कोसळली; पती-पत्नीचा जागीच मृत्यू)

दरम्यान, प्रचितीवर सध्या उपचार सुरू आहेत. तथापी, कोंढाणपूर, तालुका हवेली येथे राहणारे बसचालक सतीश गोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृताचा मुलगा विशाल दत्तात्रय साळुंके याने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांनी अपघातस्थळी भेट दिली असून पोलीस उपनिरीक्षक फिरोज शेख या घटनेचा तपास करत आहेत. (हेही वाचा - Bareilly Accident: चुकीच्या GPS Navigation मुळे कार थेट बांधकामाधीन पुलावर चाढवली; कार पुलावरून कोसळून 3 जणांचा मृत्यू.  )

30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास फिश मार्केट रोडवर पीएमपीएमएल बसने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने विश्रांतवाडी येथील स्टीफन एडविन जोसेफ (61) या मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला होता. विश्रांतवाडी पोलिसांच्या वरिष्ठ निरीक्षक कांचन जाधव यांनी सांगितले की, जोसेफ हे एका खासगी कंपनीचे निवृत्त कर्मचारी होते. जोसेफ खाद्यपदार्थ घेण्यासाठी बाजारात गेले होते. ते मोटरसायकलवरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक बसने त्याला मागून धडक दिली.