प्रवासादरम्यान प्रसूतीकळा सुरु झाल्याने ठाणे स्टेशनवरच महिलेने दिला बाळाला जन्म

काल स्टेशनवर एका महिलेने मुलाला जन्म देण्याची घटना घडली. ही महिला लोकलने आपल्या घरी परतत असताना तिच्या पोटात दुखू लागले, त्यानंतर तिला स्टेशनवरील क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले

Woman Delivers Baby at Thane Station (Photo Credits: ANI)

ठाणे (Thane) स्टेशनवरील कालची संध्याकाळ अगदी खास होती. काल स्टेशनवर एका महिलेने मुलाला जन्म देण्याची घटना घडली. ही महिला लोकलने आपल्या घरी परतत असताना तिच्या पोटात दुखू लागले, त्यानंतर तिला स्टेशनवरील क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. इशरत शेख असे या महिलेचे नाव असून, त्या अंबिवली ते कुर्ला असा रेल्वेने प्रवास करत होत्या. संध्याकाळी 6:30 च्या सुमारास इशरत यांनी मुलाला जन्म दिला.

रेल्वेने प्रवास करताना इशरत यांच्या अचानक पोटात दुखू लागले. त्यानंतर रेल्वे सुरक्षा पथकातील महिलांनी गर्भवती इशरत यांना तात्काळ रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेल्या वन रुपी क्लिनिक (one rupee clinic) इथे नेले. साधारण साडेसहा वाजता त्यांची प्रसूती होऊन त्यांनी एका मुलाला जन्म दिला. याबाबत वन रुपी क्लिनिकचे सीईओ राहुल घुले यांनी सांगितले की, ‘आई आणि बाळ दोघेही सुखरूप असून, त्यांना पुढील उपचारासाठी ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. याबाबत आम्ही रेल्वे पोलिसांचे आभार मानतो. तसेच रेल्वेने हा वन रुपी क्लिनिक उपक्रम सुरु केल्याने त्यांचेही आभार’.

4 मार्चला कोलकाता येथे अशीच घटना घडली,आगरतळा-हबीबगंज एक्सप्रेसने प्रवास करण्याऱ्या महिलेचे स्टेशनवर प्रसूती झाली होती. तर डिसेंबर 2018 मध्ये दादर स्थानकावर पुण्याला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत असणाऱ्या महिलेला प्रसुतीकळा सुरु झाल्या आणि तिने स्टेशनवरच बाळाला जन्म दिला.