Maharashtra Political Crisis: कोण आहेत 'मातोश्री'चे निष्ठावंत मानले जाणारे एकनाथ शिंदे? ज्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला झटका, जाणून घ्या

2001 मध्ये त्यांची ठाणे महापालिकेत सभागृह नेतेपदी निवड झाली आणि 2004 पर्यंत ते या पदावर राहिले. 2004 मध्ये एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली.

Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या (Legislative Council Election) निकालानंतर शिवसेनेत (Shiv Sena) फूट पडल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. गुजरातमधील हॉटेलमध्ये थांबलेले महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी शिवसेनेला संपर्क होऊ शकला नसल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय आतापर्यंत शिवसेनेच्या इतर 21 आमदारांशीही पक्ष संपर्क करू शकलेला नाही. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दुपारी 12 वाजता आमदारांची बैठक बोलावली आहे.

कोण आहेत एकनाथ शिंदे?

एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी झाला. ते सध्याच्या महाराष्ट्र सरकारचे नगरविकास मंत्री आहेत. एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच शिवसेनेशी संबंधित असून ते सध्या ठाण्यातील पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग 4 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात असून त्यांना 'मातोश्री'चे निष्ठावंत असंही म्हटलं जातं. मातोश्री हे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आहे. (हेही वाचा - Shiv Sena: शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर? एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठ्या संख्येने आमदार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर यांच्याकडून डॅमेज कंट्रोल सुरु)

1980 मध्ये केला होता शिवसेनेत प्रवेश -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 1970-80 च्या दशकातील महाराष्ट्रातील इतर तरुणांप्रमाणेच एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा प्रभाव होता. 1980 च्या दशकात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि किसान नगरचे शाखाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून ते सामाजिक आणि राजकीय विषयांवर पक्षाच्या अनेक आंदोलनांमध्ये आघाडीवर होते.

2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवड -

1997 मध्ये ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना नगरसेवकपदाचे तिकीट दिले आणि ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. 2001 मध्ये त्यांची ठाणे महापालिकेत सभागृह नेतेपदी निवड झाली आणि 2004 पर्यंत ते या पदावर राहिले. 2004 मध्ये एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली. या निवडणुकीत ते प्रचंड बहुमताने विजयी झाले.

2014 मध्ये विधिमंडळ पक्षाच्या नेते पदी नियुक्ती -

एकनाथ शिंदे यांची 2005 साली शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. 2014 च्या निवडणुकीनंतर, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी आणि नंतर महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. यानंतर शिवसेना राज्य सरकारमध्ये सामील झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम) मंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर त्यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारली.