मंत्रालयात पाणीबाणी; धनंजय मुंडेंच्या बंगल्यात कर्मचारी भरतायत बादलीने पाणी
त्यामुळे जनतेच्या पाणीटंचाईवर तोडगा कसा निघणार, असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
राज्यावर यंदा दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. ग्रामिण भागात पाणीटंचाईच्या रुपात त्याचे संकेतही दिसू लागले आहेत. अशा स्थितीत जनतेच्या अडचणींवर तोडगा काढण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी मायबाप सरकारवर असते. पण, मुळात सरकारच त्या अडचणींचा सामना करत असेल तर? राजधानी मुंबईतील मंत्रालय परिसरात सध्या हेच चित्र दिसत आहे. मंत्रालय परिसरात असलेल्या मंत्र्यांच्या बंगल्यातच सद्या पाणीटंचाई सुरु आहे. मंत्रालय परिसरातील पाणीटंचाई इतक्या टोकाला पोहोचली आहे की, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यात चक्क बादलीने पाणी भरले जात आहे. बंगल्यातील कर्मचारी इतर ठिकाणाहून बादलीने पाणी आणतात. खुद्द मंत्रालयच पाणीबाणीत अडकले आहे . त्यामुळे जनतेच्या पाणीटंचाईवर तोडगा कसा निघणार, असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
मंत्रालय परिसरात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याप्रमाणेच इतरही मंत्र्यांचे बंगले आहेत. त्यामुळे त्यांच्याही बंगल्यातील कर्मचाऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेले काही दिवस या परिसरात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पण, बाहेरुन पाणी आणावे लागत असल्याने कर्मचारी मात्र त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, 'एबीपी माझा'ने दिलेल्या वृत्तात, गेले आठ दिवस पाणी येत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारींची दखल घेतली असून, पाणी पुरवठा करणाऱ्या कनेक्शनमध्ये असणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील. त्यानंतर दुपारपर्यंत पाणीपुरवठा पुर्ववत होईल असे 'अ' वॉर्डचे अधिकारी किरण दिगावकर यांनी सांगितले आहे.