Mumbai Water Issue: मुंबईवर पाणीसंकट! सात धरणांमध्ये केवळ 26 टक्के पाणीसाठा उपलब्ध
सध्याचे पाणी संकट पाहता दोन महिन्यांच्या पाणी नियोजनासंदर्भात विशेष कृती आराखडा सादर करण्याचे आदेश राज्यातील सर्व महापालिकांना दिले आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये कमी पाणीसाठी उपलब्ध राहिल्याने मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट धोंगावत आहे. यामुळे आवश्यकता भासल्यास भातसा आणि अप्पर वैतरणा या दोन धरणांतील राज्य सरकारच्या राखीव साठ्यावर मदार असणार आहे. या पाणीसाठ्याच्या वापरासाठी आवश्यक प्रस्ताव मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवला असून त्याच्या मंजुरीची मुंबई महापालिकेला प्रतीक्षा आहे. सध्या सात धरणांमध्ये 26 टक्के पाणी असून दर 15 दिवसांनी त्याचा आढावा घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
सध्याचे पाणी संकट पाहता दोन महिन्यांच्या पाणी नियोजनासंदर्भात विशेष कृती आराखडा सादर करण्याचे आदेश राज्यातील सर्व महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या जलअभियंता विभागानेही हा आराखडा सादर केला आहे. पाण्याची सद्यस्थिती काय आहे, गरज किती आहे, जलसंकट उभे राहिल्यास पाणीपुरवठ्याचे नियोजन काय असेल, असे अनेक प्रश्न सरकारकडून महापालिकांना विचारण्यात आले आहेत. राखीव कोट्यातील पाणीवापराचाही पर्याय असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांपैकी भातसा आणि अप्पर वैतरणा ही धरणे राज्य सरकारच्या अखत्यारित येतात. नियमितपणे पाणीपुरवठा करताना गरज भासल्यास या दोन धरणांमधून राखीव कोट्यातील पाणी मुंबईला मिळू शकते.
पाऊस लांबला आणि पाणीटंचाई निर्माण झाल्यास या धरणातील पाण्याचा वापर मुंबईकरांसाठी करता येऊ शकेल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच दर 15 दिवसांनी सात धरणांतील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती सरकारला देण्यात आली आहे.