Sangli Lok Sabha Seat: सांगलीच्या जागेवरुन खडाजंगी सुरुच, विशाल पाटलांसाठी विश्वजीत कदम आक्रमक
उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे प्रमुख नेते नाराज झाले होते.
सांगली लोकसभेच्या (Sangli Loksabha) जागेवरुन महाविकास आघाडीत खडाजंगी ही सुरुच आहे. ठाकरे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या उमेदवार यादीत सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. परंतु, काँग्रेस पक्ष सांगलीची जागा (Sangli Loksabha) ठाकरे गटासाठी सोडायला तयार नाही. त्यासाठी काँग्रेस नेते विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) आणि इच्छूक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बुधवारी थेट दिल्लीत जाऊन पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली. यावेळी विश्वजीत कदम यांनी आक्रमक भूमिका घेत सांगलीची जागा काँग्रेसचीच आहे, असे त्यांना सांगितले आहे. (हेही वाचा - Congress vs Shiv Sena-UBT: काँग्रेस नेत्याकडून शिवसेना (UBT) उमेदवाराचा 'खिचडी चोर' असा उल्लेख)
काँग्रेसचे विशाल पाटील हे सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत होते. सांगलीचा पुढचा खासदार विशाल पाटील हेच असतील, अशी खात्रीही अनेकांना होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेसाठी परस्पर चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. बुधवारी ठाकरे गटाने प्रसिद्ध केलेल्या उमेदवार यादीत सांगलीच्या जागेसाठी चंद्रहार पाटील यांचेच नाव होते. परंतु, काँग्रेस पक्ष ही जागा सोडायला तयार नाही. उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे प्रमुख नेते नाराज झाले होते.
विश्वजीत कदम यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगली लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचाच हक्क असल्याचे सांगितले. याठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असे आम्ही मल्लिकार्जून खरगे यांना सांगितले. विशाल पाटील यांची उमेदवारी मी आणि आमच्या सहकाऱ्यांनी निश्चित केली आहे. शेवटचा पर्याय म्हणून आम्ही सांगलीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहोत असेही त्यांनी सांगितले.