विरार: आईच्या निधनानंतर आठ महिन्यांच्या मुलीची 2 लाखांना विक्री; आरोपींना अटक

यात दोन महिला आणि दोन पुरुष यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील एक आरोपी डॉक्टर आहे.

Baby (Photo Credits; Pixabay) (Representational image Only)

विरारमध्ये (Virar) 8 महिन्याच्या मुलीला 2 लाख रुपयांत विकण्याचा प्रयत्न करत असलेल्या टोळीला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. यात दोन महिला आणि दोन पुरुष यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील एक आरोपी डॉक्टर आहे. याप्रकरणी पोलिसांनी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना 16 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर चिमुकलीची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. (लज्जास्पद! जन्मदात्या आईने 10,000 रुपयांसाठी केली अवघ्या 15 दिवसांच्या पोटच्या मुलीची वेश्या व्यवसायाला विक्री)

कोविड-19 काळात चिमुकलीची आई मृत पावली. तर वडीलही बेपत्ता आहेत. त्यामुळे ही चिमुकली आपल्या नातेवाईकांकडे राहत होती. आर्थिक फायद्यासाठी या चिमुकलीची विक्री करण्यात येत होती. मात्र त्यापूर्वीच विरार पोलिसांना यांचा सुगावा लागला आणि आरोपींचा कट पुरता फसला. सध्या मुलीला बालसंगोपन केंद्रात दाखल करण्यात आले असून या कटात नातेवाईक सामील आहेत का? यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.

यापूर्वी अशीच एक घटना मुंबईतून समोर आली होती. 15 दिवसांच्या नवजात चिरमुरडीची तिच्या वडीलांकडून वेश्या व्यवसायासाठी विक्री करण्यात आली होती. मात्र याची घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत आरोपींना अटक केली होती.

महिला, अल्पवयीन मुली यांच्यावरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी स्त्री कडे पाहण्याच्या दृष्टीकोनात बदल होणे फार आवश्यक आहे. तसंच आपल्या आजूबाजूला अशा प्रकारच्या काही घटना घडत असल्यास त्या पोलिसांच्या निर्दशनास आणून देणे आपले कर्तव्य आहे. त्याचबरोबर मुलींच्या सुरक्षेबाबत विशेष सतर्कता बाळगणे देखील महत्त्वाचे आहे.