Open SSC Exam : दिव्यांग, कलाकार आणि खेळाडू विद्यार्थी शाळेशिवाय देऊ शकणार दहावीची परीक्षा
आज राज्य उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओपन एसएससी बोर्ड सुरू करण्यात आले आहेत.
Open SSC Exam Board: शाळा म्हणजे अभ्यास एके अभ्यास असा नियम असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनात त्यांचं पॅशन जपण्याला पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र आता राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक घोषणा केली आहे. आज राज्य शिक्षण मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओपन एसएससी बोर्ड (Open SSC Exam Board) सुरू करण्यात आले आहेत. येत्या 10 जानेवारी तारखेपासून हे बोर्ड सुरू होणार आहे.
Open SSC Exam म्हणजे काय ?
दिव्यांग, कलाकार आणि खेळाडू विद्यार्थ्यांसाठी राज्यसरकारने ही मोठी घोषणा केली आहे. आता विद्यार्थ्यांना थेट दहावीची परीक्षा देता येईल. शाळेशिवाय आता परीक्षा देता येणार आहे. यामुळे त्यांना त्यांच्या पॅशनला जपण्यासाठी अधिक वेळ देता येणार आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा जून किंवा डिसेंबर महिन्यात होईल. 10 वर्षांचा विद्यार्थी थेट पाचवीची, 13 वर्षांचा विद्यार्थी थेट आठवीची आणि 15 वर्षांचा विद्यार्थी थेट दहावीची परीक्षा देऊ शकणार आहे. ओपन एससीसी बोर्डाच्या प्रमाणपत्राची मान्यता देखील इतर बोर्डांसारखीच असेल.
गायन, अभिनय,नृत्य अशा कला जोपासणार्या विद्यार्थ्यांना कलेची साधना करण्यासाठी आता अधिक वेळ मिळणार आहे. त्यासोबतच खेळाडू विद्यार्थी मैदानावर सराव करू शकतील. दिव्यांग विद्यार्थ्यांनादेखील नियमित शाळेत येणं कठीण असेल तर त्यांना थेट परीक्षा देता येणार आहे.