Village Skilling Centres: ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य सरकारची मोठी योजना; लवकरच सुरु करणार 500 कौशल्य केंद्रे
आता अशा केंद्रांसाठी अर्ज येण्यास सुरुवात झाली असून, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, असेही मंत्री लोढा यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र सरकार 500 गाव कौशल्य केंद्रे (Village Skilling Centres) विकसित करण्याचा विचार करत आहे. ही प्रक्रिया पूर्णत्वास आली असून, लवकरच केंद्रे सुरू होण्याची शक्यता आहे, असे महाराष्ट्राचे कौशल्य-विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. विविध स्किल्स, अपस्किलिंग, रीस्किलिंग इत्यादी संकल्पना या प्रामुख्याने शहरी-केंद्रित आहे, परंतु सरकारने ग्रामीण कौशल्य केंद्रांची आवश्यकता ओळखून, ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करण्यासाठी अशी कौशल्य केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेसाठी अर्थसंकल्पात 50 कोटींची तरतूद करण्यात आली होती. आता अशा केंद्रांसाठी अर्ज येण्यास सुरुवात झाली असून, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, असेही मंत्री लोढा यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्री लोढा म्हणाले, ‘सध्या आम्ही ही केंद्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक दिनी सुरू करण्याची योजना आखत आहोत, जो ऑनलाइन कार्यक्रम असेल.’
लोढा पर्यटन खात्याची जबाबदारीही सांभाळतात. विभागांतर्गत नवीन योजनांबाबत विचारले असता मंत्री म्हणाले की, बौद्ध थीम पार्क विकसित करण्यासाठी अजिंठा आणि एलोरा येथे 10 बौद्ध देशांना प्रत्येकी 5 एकर जमीन देण्याचा विचार राज्य करत आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर त्यांचे जीवन आणि घडलेल्या घटनांबाबत प्रदर्शन आणि संग्रहालय विकसित करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. (हेही वाचा: Sanjay Raut On Shinde Govt: महाराष्ट्रात शिंदे सरकार टिकू नये, अशी भाजपची इच्छा, मुख्यमंत्री हटवण्याची तयारी सुरू; संजय राऊत यांचा दावा)
वीर सावरकरांचा जन्म झालेल्या नाशिकजवळील भगूर येथे सावरकर थीम पार्क आणि येत्या पावसाळ्यापासून कोकणात पावसाळी महोत्सवाची सुरुवात करण्याचीही सरकारची योजना आहे, असेही मंत्री म्हणाले. मुंबईत, दुबई महोत्सवाच्या धर्तीवर मुंबई महोत्सवाचे आयोजन करण्याची सरकारची योजना आहे. राज्यातील सर्व ट्रेकिंग पॉईंटवर शौचालयासारख्या मूलभूत सुविधा विकसित केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.