Cat News & Pune Crime : मांजर मेल्याचा राग, मालकाकडून पशुवैद्यकीय डॉक्टरला मारहाण, पायाला फ्रॅक्चर

परंतू, मांजर मेले म्हणून आरोपी महिलेने पशुवैद्यकीय डॉक्टरला (Veterinary Doctor) मारहाण ही तशी दुर्मिळच घटना. ही घटना हडपसर (Hadapsar) परिसरात घडली आहे.

Cat | Representational image (Photo Credits: pxhere)

पाळीव मांजर (Pet Cat) मृत्यूस चक्क डॉक्टरांना जबाबदार धरत त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुणे (Pune) शहरात घडली आहे. आजवर एखादा नातेवाईक, नेता किंवा व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला तर डॉक्टरला मारहाण झाल्याच्या घटना आपण पाहिल्या, ऐकल्या आहेत. परंतू, मांजर मेले म्हणून आरोपी महिलेने पशुवैद्यकीय डॉक्टरला (Veterinary Doctor) मारहाण ही तशी दुर्मिळच घटना. ही घटना हडपसर (Hadapsar) परिसरात घडली आहे. मांजराचा मालक आणि मालकाचे नातेवाईक यांनी केलेल्या मारहाणीत व्हेट्रनरी डॉक्टरचा (Veterinary Doctor) पाय फ्रॅक्चर झाला आहे. रामनाथ ढगे असे डॉक्टरचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे.

हडपसर पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे मांजराचा मालक असलेली व्यक्तीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहतीनुसार, आरोपी महिलेचे मांजर पाठिमागील दोन दिवसांपासून आजारी होते. त्याने अन्नपाणी सोडले होते. त्यामुळे ही महिला आपले मांजर घेऊन डॉ. रामनाथ ढगे यांच्या क्लिनीकमध्ये आली होती. डॉ. ढगे यांनी मांजरावर उपचार केले. परंतू, त्याचा फायदा झाला नाही. मांजराचा मृत्यूच झाला. मांजराचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच महिलेने तिचा पती आणि मुलाला क्लिनिकमध्ये बोलावून घेतले. त्यांनी डॉक्टरला मांजर मेलेच कसे? असा प्रश्न करत जाब विचारण्यास सुरुवात केली. यात बाचाबाची वाढली प्रकरण मुद्द्यावरुन गुद्द्यावर आले. अखेर चौघांनी मिळून डॉक्टरला मारहाण केली. डॉक्टरला झालेल्या मारहानी विरोधात व्हेट्रनरी डॉक्टर असोसिएशन आता आंदोलन करणयाच्या विचारात आहे.

हडपसर पोलिसांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सदर घटना 10 डिसेंबर रोजी घडली आहे. मांजर मालक आणि आरोपींनी केलेल्या मारहाणीत डॉक्टरचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यातआले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मारहाणीच्या घटनेनंतर तक्रार दाखल होताच आरोपी पसार झाले आहेत. मारहाणीची घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.