Veer Savarkar Jayanti 2023: यंदा मॉरिशस येथे होणार सावरकर विश्व संमेलन; सावरकरांच्या पुतळ्याच्या अनावरणासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन

महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये रस्ते विकास, पायाभूत सुविधा, गुंतवणूक याबाबत मंत्री चव्हाण विविध स्तरांवर भेटीगाठी घेणार असून दोहोंमध्ये परस्पर सहकार्य करण्यावर त्यांचा भर असणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर (फोटो सौजन्य-फेसबुक)

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Vinayak Damodar Savarkar) तेजस्वी विचार पुढील पिढीत नेण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु राहावे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. यावर्षी हे संमेलन, मॉरिशस (Mauritius) येथे स्वा.सावरकरांच्या जयंतीनिमित्त 28 मे 2023 रोजी संपन्न होणार आहे. मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मॉरिशस येथे होणाऱ्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन आणि उपपंतप्रधान लीलादेवी डुकन लच्छुमन यांची उपस्थिती लाभणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातून असंख्य सावरकर भक्त या अपूर्व सोहळ्यासाठी मॉरिशसमध्ये दाखल होणार आहेत.

महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये रस्ते विकास, पायाभूत सुविधा, गुंतवणूक याबाबत  मंत्री चव्हाण विविध स्तरांवर भेटीगाठी घेणार असून दोहोंमध्ये परस्पर सहकार्य करण्यावर त्यांचा भर असणार आहे. मॉरिशस म्हणजे चहूबाजूंनी हिंदी महासागराने वेढलेले पाचूचे बेट असून निसर्गाने मुक्त उधळण केलेले पर्यटन स्थळ आहे. सागरी जैव विविधता आणि पारदर्शक स्फटिकासारखे निळेशार पाणी व सुंदर स्वच्छ समुद्रकिनारे अनुभवणे असा सुवर्णयोग जुळून आला आहे. (हेही वाचा: Shardiya Navratri 2023 Date: शारदीय नवरात्र कधीपासून सुरू होत आहे? तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या)

दरम्यान, राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनानिमित्ताने वीर सावरकर पर्यटन सर्किट आणि वीरभूमी परिक्रमा, असे विविध उपक्रम राबवून अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या पुढाकारातून राज्यभरात विविध ठिकाणी ‘वीरभूमी परिक्रमा’अंतर्गत ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’चे आयोजन 21 ते 28 मे 2023 दरम्यान करण्यात आले आहे.