Vasant More यांनी घेतली 'मातोश्री' वर उद्धव ठाकरे यांची भेट; 'वंचित' ची साथ सोडून आता हाती शिवबंधन बांधणार!
वसंत मोरे मूळचे शिवसैनिक होते. नंतर ते राज ठाकरेंसोबत मनसे मध्ये होते.
लोकसभा निवडणूकीपूर्वी मनसे ची साथ सोडून वंचित मध्ये दाखल झालेल्या वसंत मोरे (Vasant More) यांनी आज 'मातोश्री' वर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंसोबतच्या या भेटी मध्ये संजय राऊत, विनायक राऊत देखील उपस्थित होते. वसंत मोरे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 9 जुलैला पक्षप्रवेश होणार आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये वसंत मोरे यांना तिकीट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक पुण्यामधून लढली. ही निवडणूक तिरंगी होईल अशी चर्चा असताना भाजपाच्या मुरलीधर मोहोळ यांनी लाखभराच्या मताधिक्याने जिंकली. लोकसभेमध्ये त्यांचं डिपॉझिट देखील जप्त झाले होते पण वसंत मोरे विधानसभेसाठी प्रयत्नामध्ये आहे. हडपसर मधून त्यांना तिकीट मिळू शकते अशी चर्चा आहे.
दरम्यान वसंत मोरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या घर वापसीच्या चर्चा रंगल्या आहे. वसंत मोरे मूळचे शिवसैनिक होते. नंतर ते राज ठाकरेंसोबत मनसे मध्ये होते. मनसैनिक असताना पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना 2007, 2012, 2017 असे सलग तीन वेळेस ते नगरसेवक म्हणून निवडून आले. महापालिकेत ते विरोधी पक्ष नेते देखील होते. मात्र राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याबद्दल घेतलेल्या भूमिकेवरून ते नाराज झाले आणि त्यांच्याशी निगडीत अंतर्गत कुरबुरीचे अनेक प्रकार समोर आले. लोकसभा निवडणूकी पूर्वी त्यांना मनसेला सोडचिठ्ठी देत वंचित मधून खासदारकीचं तिकीट मिळवलं. मात्र ते पराभूत झाले.