Varsha Gaikwad Tested Positive For Coronavirus: महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना विषाणूची लागण; संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची चाचणी करून घेण्याचे आवाहन

दिवसेंदिवस या विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे वाढतच आहेत. या काळात सामान्य नागरिकांसोबत मंत्री, आमदार, खासदार अशा नेते मंडळींनाही याचा धोका वाढला आहे.

Education Minister Varsha Gaikwad (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रामधील (Maharashtra) कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांची एकूण संख्या 12,42,770 झाली आहे. दिवसेंदिवस या विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे वाढतच आहेत. या काळात सामान्य नागरिकांसोबत मंत्री, आमदार, खासदार अशा नेते मंडळींनाही याचा धोका वाढला आहे. अशा लोकांचा जनसंपर्क असल्याने याआधी अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता माहिती मिळत आहे की, ठाकरे सरकारमधील महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Of School Education Varsha Gaikwad) यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. गायकवाड यांनी स्वतः ट्वीट करत ही माहिती दिली.

आपल्या ट्वीटमध्ये वर्षा गायकवाड म्हणतात, ‘नमस्कार, आज माझ्या तपासणीदरम्यान मला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यांमुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे करोना चाचणी करून घ्यावी. सुरक्षित राहा. काळजी घ्या.’

पहा ट्वीट -

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड या कॉंग्रेसच्या धारावी विधानसभेच्या आमदार आहेत. गायकवाड यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर अनेकांनी त्या लवकर बऱ्या व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे. यासह महाराष्ट्रात सध्या कोविड-19 संक्रमित मंत्र्यांची संख्या तीन झाली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील 12 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी नऊ संसर्गातून बरे झाले आहेत. (हेही वाचा:  महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोना विषाणूची लागण; स्वतःला आयसोलेट केल्याची माहिती)

याआधी शुक्रवारी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. नितीन राऊत यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. राऊत यांच्या व्यतिरिक्त राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनाही शुक्रवारी कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. दरम्यान, दरम्यान, महाराष्ट्रामध्ये आज कोरोनाच्या 18,390 रुग्णांची नोंद झाली आहे. आज शहरामध्ये कोरोनाचे 20,206 रुग्ण बरे झाले आहेत व आज 392 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 12,42,770 झाली आहे. यामध्ये 2,72,410 सक्रीय रुग्ण आहेत, 9,36,554 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत आणि 33, 407 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.