Vande Bharat Express: प्रवाशांना दिलासा! लवकरच सुरु होणार मुंबई-कोल्हापूर आणि पुणे-वडोदरा वंदे भारत एक्सप्रेस, जाणून घ्या सविस्तर

पुणे-वडोदरा वंदे भारत एक्स्प्रेस वसई रोडवरून धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी दिली आहे.

Vande Bharat | Twitter

Maharashtra New Vande Bharat Express: प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर करण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर 2 नवीन वंदे भारत (Vande Bharat Express) सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेने केली आहे. मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी या मार्गांवर वंदे भारत सुरू झाल्यापासून मुंबई ते कोल्हापूर मार्गावर वंदे भारत (Mumbai-Kolhapur Vande Bharat) सुरू करण्याची मागणी होत होती. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मुंबई-कोल्हापूर वंदे भारत सुरू करण्यात येत आहे. तसेच पुणे ते वडोदरा मार्गावरही वंदे भारत चालवण्यात येणार आहे. तुळजापूरमार्गे शिर्डी, अक्कलकोट, सोलापूर या मंदिरांना वंदे भारताच्या माध्यमातून जलद कनेक्टिव्हिटी मिळाल्यानंतर, आता त्यात कोल्हापूरचाही समावेश होणार असल्याने भाविकांसाठी ही सेवा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

वंदे भारत ही महाराष्ट्र आणि गुजरात दरम्यानची सर्वात वेगवान बुलेट ट्रेन म्हणून पुणे-वडोदरा मार्गावर धावणार आहे. पुणे-वडोदरा वंदे भारत एक्स्प्रेस वसई रोडवरून धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी दिली आहे. सर्वाधिक वंदे भारत ट्रेनच्या यादीत महाराष्ट्र हे राज्य पहिल्या नंबरवर आहे. महाराष्ट्रात एकूण 6 वंदे भारत ट्रेन धावतात. आता ही संख्या 8 वर जाईल.

सध्या वंदे भारत गाड्या मुंबई सेंट्रल ते गुजरातमधील गांधीनगर, सीएसएमटी ते गोव्यातील मडगाव, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते सोलापूर आणि सीएसएमटी ते जालना या मार्गांवर धावतात. यासह अजून एक वंदे भारत ट्रेन मध्य प्रदेशातील बिलासपूर ते नागपूर दरम्यान धावते. आता कार्यक्षम रेल्वे प्रवासाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, भारतीय रेल्वे महाराष्ट्रात मुंबई-कोल्हापूर आणि पुणे-वडोदरा वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. (हेही वाचा: PM Modi Inaugurates India's First Underwater Metro: देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे लोकार्पण, पंतप्रधान मोदींनी शालेय विद्यार्थ्यांसोबत केला प्रवास)

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खुलासा केला की, या नव्या दोन ट्रेन्सच्या योजनांना अंतिम रूप देण्याचे काम सुरू आहे. या गाड्यांच्या परिचयाच्या तारखांची अद्याप पुष्टी होणे बाकी आहे. त्यांनी पुढे नमूद केले, ‘हे उपक्रम रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या आणि उत्तम कनेक्टिव्हिटीला चालना देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहेत. जसजसे रेल्वे नेटवर्क विकसित होत आहे, तसतसे वंदे भारत एक्स्प्रेस एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून उदयास आली आहे यामुळे सेमी-हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी मिळते आणि प्रवाशांना वाहतुकीचे आरामदायी तसेच वेळ-कार्यक्षम साधन सुनिश्चित होते.’