IPL Auction 2025 Live

गणेशोत्सवासाठी कोकणात जाताना वापरा हे पर्यायी मार्ग

गणेशोत्सवाची धूम जितकी मुंबई-पुण्यात पाहायला मिळते तितकीच कोकणातही दिसते. कोकणातील आपल्या घरी गणेशोत्सव साजारा करावा अशी प्रत्येक चाकरमान्याची इच्छा असते, म्हणूनच गणपतीच्या या दहा दिवसांत फार मोठ्या संख्येने भाविक कोकणात जात असतात. कोकणात उतरण्यासाठी मुंबई-गोवा या राज्यामार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो यामुळेच दरवर्षी लोकांना प्रचंड ट्राफिकलाही तोंड द्यावे लागते. याच प्रश्नावर तोडगा म्हणून राज्य महामार्ग पोलिसांनी काही पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. यासंदर्भात पोलिसांनी सुचवलेले काही पर्यायी मार्ग

मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून कोल्हापूरमार्गे रत्नागिरी-सिंधुदुर्गकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

रायगड जिल्ह्यात जाणाऱ्या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कळंबोली-पनवेल बायपास ते पळस्पे फाटा आणि मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरून खोपोली-पाली – वाकण मार्गाचा वापर करावा.

रत्नागिरी व सिंधुदुर्गात जाणाऱ्या व चिपळूणला जाणाऱ्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-उंब्रज-पाटण- कोयना नगर- कुंभार्ली घाट मार्गे खेर्डी-चिपळूण रस्त्याचा वापर करावा.

हातखंबा येथे जाणाऱ्यांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-कराड-वाठार-टोप-मलकापूर-शाहूवाडी- आंबाघाट मार्गे लांजा-राजापूर मार्गाचा वापर करता येईल.

कणकवलीला जाण्यासाठी तुम्ही मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-कराड-कोल्हापूर शहरातून रंकाळा तलावावरून कळे-गगनबावडा घाट मार्गे वैभववाडी–कणकवली या मार्गाचा वापर करू शकता.

मुंबईवरून सावंतवाडीला जाणाऱ्या लोकांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-कराड-कोल्हापूर-निपाणी-आजरा-आंबोली घाट मार्गे सावंतवाडीला जाता येईल.

कोकणात जाणाऱ्या कोणत्याही मार्गावरील वाहतुकीसंदर्भात तसेच इतर माहितीसाठी महामार्ग पोलीसांच्या www.highwaypolice.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा हेल्पलाईन क्रमांक 9833498334 व 9867598675 यावर संपर्क साधावा. तसेच 9503211100 व 9503511100 या क्रमांकावर संदेश पाठविता येईल, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.