मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली भेटीनंतर 'वर्षा'वर तातडीची बैठक; CAA, NPR, एल्गारच्या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता
या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उपस्थित झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दिल्ली भेटीनंतर वर्षावर ताडडीची बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उपस्थित झाले आहेत. तसेच या बैठकीत सीएए (CAA), एनपीआर (NPR) आणि एल्गार परिषदच्या (Elgar Parishad ) मुद्यावर चर्चा होण्याची शक्य व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून वर्षा बंगल्यावर होणारी ही सर्वात मोठी बैठक मानली जात आहे. नुकतीच उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. दरम्यान, सीएए, एनपीआर यांसारख्या विषयांवर चर्चा झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. यावरूनही राजकारण तापल्याचे दिसत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन माध्यमांशी संवाद साधत, सीएए कायद्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली होती. उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीत मतमतांतरे होत आहेत. कारण काँग्रेसने सीएए, एनआरसी आणि एनपीए कायद्याला जाहीर विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या कायद्यावरुन आघाडीतील सत्ताधारी तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठकीत चर्चा होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी दिल्ली भेटीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. तसेच सोनिया गांधींसोबतही उद्धव ठाकरे यांनी विविध विषयावर चर्चा केली होती. यामुळे आजची बैठकीत सीएए आणि एनपीआर या मुद्यावरून चर्चा होणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली; 7 मार्च ला घेणार रामलल्लाचे दर्शन
महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी तिन्ही पक्षाने एकत्रित येऊन महाविकास आघाडीचे सत्ता स्थापन केली. हे तिन्ही पक्ष भिन्न विचाराचे असल्यामुळे यांच्यात तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेच्या तपासावरुनही काहीशी मतमतांतरे आहेत. भीमा कोरेगावचा तपास एनआयएला दिला आहे. मात्र तपास राज्यातील विशेष तपास पथकाद्वारे व्हावा अशी भूमिका राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे या भेटीत त्याबाबतही चौकशी होऊ शकते.