Unseasonal Rains: शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी 177 कोटी रुपयांचा निधी वितरीत

त्यानुसार आज राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला.

CM Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णयदेखील काढण्यात आला.

दि.४ ते ८ मार्च व दि.१६ ते १९ मार्च, २०२३ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.

मार्चमधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार आज राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला. (हेही वाचा: Skymet Monsoon Forecast in Maharashtra: यंदा भारतात मान्सून सामान्यापेक्षा कमी राहणार; मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा एकदा दुष्काळजन्य परिस्थिती उद्धभवण्याची शक्यता)

महसुली विभागनिहाय वितरित करण्यात आलेला निधी पुढीलप्रमाणे-

अमरावती विभाग – २४ कोटी ५७ लाख ९५ हजार,

नाशिक विभाग ६३ कोटी ९ लाख ७७ हजार,

पुणे विभाग ५ कोटी ३७ लाख ७० हजार,

छत्रपती संभाजी नगर ८४ कोटी ७५ लाख १९ हजार.

एकूण निधी- १७७ कोटी ८० लाख ६१ हजार

दरम्यान, आज बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे या गावामध्ये बिगरमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तत्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून मंत्रिमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी देऊन यावेळी शेतकऱ्यांना धीर दिला.