Unlock 5: BEST Buses ना पूर्ण क्षमतेने प्रवास करण्यास महाराष्ट्र सरकारची परवानगी
परंतु, प्रवासादरम्यान मास्क घालणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
बेस्ट बसेसना (BEST Buses) पूर्ण क्षमतेने प्रवास करण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारने आज (शुक्रवार, 23 ऑक्टोबर) दिली आहे. परंतु, प्रवासादरम्यान मास्क घालणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. तसंच बसेसचे वेळोवेळी निर्जुंतीकरणही केले जाईल. त्याचबरोबर सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. दरम्यान, बेस्ट अधिकारी काही मार्गांवरील बसेसची संख्या सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाढवण्याचा विचारही करत आहेत. बुधवार (21 ऑक्टोबर) पासून महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिल्यानंतर आता बेस्ट बसेसची क्षमता वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
बेस्टचा 3500 बसेसचा ताफा आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दररोज 1 हजार बसेस प्रवास करतात. लॉकडाऊन काळात बंद असलेल्या बेस्ट बसची सेवा 8 जून पासून पुन्हा सुरु करण्यात आली. त्यावेळेस केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सरकारी आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी या बसेस धावत होत्या. परंतु, आता सर्वसामान्य नागरिकही बेस्ट बसने प्रवास करु शकतात. (मोनोरेल, मेट्रोतून प्रवास करताना काय आहेत महत्त्वाचे नियम, जाणून घ्या)
महाराष्ट्रात अनलॉकिंगच्या माध्यमातून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे काम सुरु आहे. सध्या अनलॉक 5 सुरु असून त्याअंतर्गत टप्प्याटप्याने बंद असलेल्या सेवा पुन्हा सुरु करण्यात येत आहेत. दरम्यान, अनलॉक 5 अंतर्गत रेल्वे, मेट्रो, मोनोरेल सेवा प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे. परंतु, त्यासाठी विशिष्ट नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र अद्याप शाळा, महाविद्यालयं, धार्मिक स्थळं सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
दरम्यान, राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1617658 वर पोहचला आहे. त्यापैकी 1415679 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 158852 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोना संसर्गामुळे 42633 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.