शिवतीर्थावर पार पडणार उद्धव ठाकरे यांचा भव्य शपथविधी सोहळा; देशभरातील तमाम नेत्यांना निमंत्रणे, सुरक्षेसाठी 2000 पोलीस तैनात

या सोहळ्यासाठी देशभरातील तमाम नेत्यांना आमंत्रित केले गेले आहे. सोनिया गांधी यांना खास निमंत्रण देण्यासाठी स्वतः आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेट दिल्ली येथे घेतली.

Uddhav Thackeray, Shiv Sena party chief | (Photo Credit: File Photo)

अखेर शिवसेनने ज्या गोष्टीचा अट्टाहास केला होता तो क्षण येऊन ठेपला आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) रूपाने प्रथमच ठाकरे घराण्यातील सदस्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी (Chief Minister Maharashtra) विराजमान होणार आहे. आतापर्यंत ज्या शिवतीर्थावर (Shivtirth) शिवसेनेचे अनेक कार्यक्रम पार पडले, तिथेच उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा भव्य सोहळा आयोजित केला गेला आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील तमाम नेत्यांना आमंत्रित केले गेले आहे. सोनिया गांधी यांना खास निमंत्रण देण्यासाठी स्वतः आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेट दिल्ली येथे घेतली.  या सोहळ्याचे भव्य स्वरूप पाहता मुंबई पोलिसांकडून उद्याच्या कार्यक्रमासाठी तब्बल 2000 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. ही माहिती पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी दिली.

याआधी शिवसेनेचे अनेक मेळावे शिवतीर्थावर पार पडले आहेत. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन हे क्वचित घडते. त्यामुळे या सोहळ्याच्या सुरक्षेची चिंता व्यक्त करत योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्यानुसार मुंबई पोलिसांचा तब्बल 2000 जणांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक बंदोबस्त, सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस बल, राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, मुंबई वाहतूक विभाग, अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा समावेश आहे. (हेही वाचा: आदित्य ठाकरे व सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट; उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी दिले खास निमंत्रण)

शिवाजी पार्कवर पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी तमाम जनता, महाविकास आघाडीचे सर्व नेते, आमदार, कॉंग्रेसचे मुख्यमंत्री, इतर पक्षांचे नेते, कार्यकर्ते असे हजारोंच्या सख्येनी लोक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन घडू नये म्हणून पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच सध्या वेशातील पोलीस पथक सतर्क गस्त देखील ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, कॉंग्रेस नेते विजय वडेटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार या सोहळ्यासाठी कॉंग्रेसचे सर्व मुख्यमंत्री, एमके स्टालिन, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. शिवतीर्थावर पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी सहा हजार चौरस फुटांचे व्यासपीठ उभारले जाणार आहे. यावर जवळजवळ 100 लोक बसू शकतिक इतक्या खुर्च्यांची सोय करण्यात येणार आहे. या शपथविधीसाठी नयनरम्य सेट उभारण्यासाठी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.