IPL Auction 2025 Live

Maharashtra Assembly Budget Session 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली जबरदस्त फटकेबाजी; पंतप्रधान मोदी-देवेंद्र फडणवीस यांच्यावर चढवला शाब्दिक हल्ला

आजच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अगदी आवेशाने विरोधकांना उत्तर दिले. चुकत असल्यास आमचे वाभाडे काढा पण महाराष्ट्राची बदनामी करु नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI)

1 मार्च पासून सुरु झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनचा (Assembly Budget Session 2021)  आज तिसरा दिवस आहे. आजच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जबरदस्त फटकेबाजी करत विरोधकांना अगदी आवेशाने आणि सडेतोड उत्तरं दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही शाब्दिक हल्ला चढवला. दरम्यान, 'चुकत असल्यास आमचे वाभाडे काढा पण महाराष्ट्राची बदनामी करु नका,' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच कधीतरी सारे मतभेद दूर सारून माणूस म्हणून एकत्र येऊन काम करुया, असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.

"आम्ही पाच रुपयात पोटभर शिवभोजन थाळी देतो, रिकामी थाळी वाजवायला देत नाही," असं म्हणत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. तर खोटेपणा करणं आमच्या रक्तात नाही त्यामुळे बंद दाराआड आम्ही कधी खोटेपणा केलेला नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. महाराष्ट्रातील एकही कोरोना रुग्ण किंवा त्यामुळे झालेला मृत्यू लपवलेला नाही, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच विरोधकांची चर्चा पहून 'नटसम्राट' पाहिल्याचा भास झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान म्हटले.

पहा व्हिडिओ:

पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीवरुनही मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पाठ थोपटून घ्यायला काम करणारी छाती हवी असं म्हणत जो काम करतो तो चुकाही करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. (अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी घेतली ठाकरे सरकारची शाळा, फेसबुक लाईव्हपासून अनेक मुद्द्यांवर केले भाष्य)

मेट्रो कारशेड प्रश्नावर एकत्रितपणे मार्ग काढू, त्यात राजकारण नको, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केली. सीमाप्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान, हिंदुत्वावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. जान्हवं आणि शेंडींच हिंदुत्व शिवसेनेचं नाही."

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आणि सावरकारांना भारतरत्न देण्याचा मुद्दाही त्यांनी या भाषणात उपस्थित केला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा न देणे हा करंटेपणा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी 2018, 2019 ला पत्र देण्यात आलं होतं तो अधिकार केंद्र सरकारला आहे. मात्र त्यांना भारतरत्न का दिलं जात नाही? हा सवालही त्यांनी विचारला.