Thackeray Brother's Public Rally: उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची एकाच मैदानावर लागोपाट सभा; शनिवार, रविवार राजकीय फटकेबाजीचा दिवस

शनिवार आणि रविवार असे दोन दिवस अनुक्रमे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) या दोन बंधुंच्या सभा होणार आहेत. विशेष म्हणजे या सभा एकाच मैदानावर लागोपाट होणार आहेत. उद्धव ठाकरे यांची सभा आज पार पडणार आहे.

Uddhav Thackeray, Raj Thackeray | Representational Image । (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आजचा आणि उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस अनुक्रमे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) या दोन बंधुंच्या सभा होणार आहेत. विशेष म्हणजे या सभा एकाच मैदानावर लागोपाट होणार आहेत. उद्धव ठाकरे यांची सभा आज पार पडणार आहे. तर राज यांची उद्या. दोन्ही पक्षांकडून सभेसाठी चोख नियोजन करण्यात आले आहे. दोन्ही नेत्यांच्या या सभा बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील चिखली (Chikhli ) येथे पार पडणार आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळासह प्रसारमाध्यमांतूनही जोरदार उत्सुकता आहे. तसेच, ठाकरे बंधू (Thackeray Brother's Public Rally) आपापल्या सभांमधून कोणावर निशाणा साधणार आणि शिवसैनिक, मनसैनिकांना काय मार्गदर्शन करणार याबाबत उत्सुकता आहे.

विदर्भात शिवसेनेची चांगली ताकद आहे. मात्र, शिवसेनेत झालेल्या फाटाफूटीनंतर दोन आमदार आणि एक खासदा उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड अशी या आमदारांची नावे आहेत. त्यामुळे या ठिकाणी नव्याने पक्षाची बांधणी करण्यावर ठाकरे यांना भर द्यावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेनेत झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुंबईबाहेर पडत आहेत. बुलढाण्यातील चिखलीमध्ये ते शेतकरी मेळावा घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात त्यांना साथ कशी मिळते याबाबतही मोठी उत्सुकता आहे. (हेही वाचा, Sanjay Raut on State Government: राज्य सरकारने आपली जीभ दिल्लीकडे गहाण ठेवली आहे काय? संजय राऊत यांचे टीकास्त्र)

दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काढलेल्या उद्गारांबद्दल तसेच, रामदेव बाबा यांनी केलेल्या विधानावरुनही उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच राज ठाकरे यांची सभा पार पडते आहे. साधारणपणे सहा महिन्यांनंतर राज ठाकरे हे जाहीर सभेत बोलत आहेत. या सभेत अनेकांचा हिशेब चुकता केला जाईल, असे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आधीच म्हटले आहे. त्यामुळे राज ठाकरे कोणत्या मुद्द्यांवर बोलतात याबातब उत्सुकता आहे.