Shiv Sena: धनुष्यबाण आणि शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे; निवडणूक आयोगात सुनावणी सुरु

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर राष्ट्रीय निवडणूक आयोगात आज सुनावणी पार पडणार आहे.

Shiv Sena Election Symbol | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (Shiv Sena) आणि शिवसेनेचा धनुष्यबाण (Dhanushyaban) नेमका कोणाचा? याबाबत आज (20 जानेवारी) निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर राष्ट्रीय निवडणूक आयोगात आज सुनावणी पार पडत आहे. सुनावणीला सुरुवात झाली असून, निवडणूक आयोग निर्णयाप्रत येण्याची शक्यता वर्तवलीजात आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे गटाने आपली बाजू आयोगासमोर मांडली आहे. दरम्यान, पाठिमागील वेळी उद्धव ठाकरे गटाने आपली बाजू आयोगासमोर मांडली. मात्र, आपला युक्तीवाद पूर्ण करण्यासाठी आपल्याला अधिक वेळ हवा, अशी मागणी केल्याने आयोगाने ठाकरे गटाला वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे वकील आज पुन्हा विस्ताराने आपली भूमिका मांडतील.

निवडणूक आयोगाचा निकाल आपल्याच बाजूने येईल, असा विश्वास दोन्ही बाजूंनी व्यक्त केला जात आहे. प्रत्यक्षात आयोग नेमका निर्णय काय देईल, हे कोणालाच सांगता येत नाही. दरम्यान, ज्येष्ठ विधिज्ञ कपील सिब्बल हे उद्धव ठाकरे यांची बाजू निवडणूक आयोगासमोर मांडत आहेत. तर ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी हे शिंदे गटाची बाजू मांडत आहेत. दोन्ही वकील तगडे आहेत. त्यामुळे त्यांचा युक्तवादही तसाच दणकट आहे. दोन्ही बाजूंनी दमदार युक्तीवाद झाल्याने निवडणूक आयोगालाही सर्व बाजू विचारात घेऊन कायदेशीर बाजू तपासून काळजीपूर्वक निर्णय द्यावा लागणार आहे. (हेही वाचा, Nashik Crime: उद्धव ठाकरे यांच्या सेनेसोबत वाद, शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाकडून गोळीबार; नाशिक येथील घटना)

दरम्यान, सुनावणी पूर्वी आज सकाळीच उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमची म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कायदेशीर तयारी पूर्ण झाली आहे. आम्ही जोरदार तयारी केली आहे. ज्येष्ठ वकील कपील सिब्बल हे आमची बाजू आयोगासमोर मांडणार आहेत. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण याबातब योग्य न्याय व्हावा. पक्षाची घटना, पक्षप्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणी यावर निर्णय व्हावा असे दोन अर्ज आम्ही निवडणूक आयोगाला दिले आहेत, असे अनिल देसाई यांनी म्हटले आहे.