Arjun Khotkar: शिवसेनेचा अर्जुन कोणासोबत? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? जालना येथे खोतकर करणार भूमिका स्पष्ट, रावसाहेब दानवे यांच्या सोबत दिलजमाईचे वृत्त

त्यामुळे त्याचा ताण माझ्या चेहऱ्यावर आपल्याला स्पष्ट दिसत असेल. अद्यापही मी शिवसेना (Shiv Sena) पक्षातच आहे. पुढील भूमिका मात्र जालना येथे स्पष्ट करेन, असे शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी म्हटले आहे.

Arjun Khotkar | (Photo Credit - Twitter)

विद्यमान स्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी, त्रास पाहता कोणताही व्यक्ती प्रथम स्वत:ला, कुटुंबीयांना सुरक्षीत करण्याचाच प्रयत्न करेल. त्यामुळे त्याचा ताण माझ्या चेहऱ्यावर आपल्याला स्पष्ट दिसत असेल. अद्यापही मी शिवसेना (Shiv Sena) पक्षातच आहे. पुढील भूमिका मात्र जालना येथे स्पष्ट करेन, असे शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी म्हटले आहे. अर्जून खोतकर हे सध्या दिल्लीत आहेत. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची भेट घेतली. या भेटीनंतर अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामील होतील असे अंदाज वर्तवले जात आहेत.

दरम्यान, माझ्या चेहऱ्यावर असलेल्या ताणाची कारणे आपणाला माहिती आहेत. मी फार बोलणार नाही. माजी भूमिका जालना येथे स्पष्ट करणार आहे, असे खोतकर यांनी म्हटले आहे. ज्या पद्धतीने पक्ष फुटला आहे. तो पाहता पक्षप्रमुख या नात्याने होणारा त्रास समजण्यासारखा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना बोलण्याचा अधिकार आहे, असेही खोतकर म्हणाले. (हेही वाचा, Uddhav Thackeray Interview Today: शारीरिक हालचाल थांबलेली पाहून पक्षविरोधी कारवाया सुरु झाल्या, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे)

शिवसेना पक्षाती आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करुन भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. अशा वेळी शिवसेना आणि पर्यायाने उद्धव ठाकरे यांना अनेक धक्के बसत आहेत. दरम्यान, या काळात अर्जुन खोतकर अद्यापही शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबतच होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी ते अचानक दिल्लीला पोहोचले. रावसाहेब दानवे यांच्या घरी त्यांनी चाहापानही केले. तसेच, एका बैठकीत रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांनी एकमेकांना साखर भरवत जुने वाद मिटल्याचेही संकेत दिले.

दरम्यान, अर्जुन खोतकर हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते शिवसेनेला सोडणार नाहीत. दोन दिवसांपूर्वीच त्यांचे आणि माझे बोलणे झाले. काही झाले तरी रावसाहेब दानवे यांना राजकारणात गाढल्याशिवाय राहणार नाही असे उद्गार काढले होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. काहीतरी गैरसमजातून घडले असेल. जो पर्यंत अर्जुन खोतकर हे स्वत:हून सांगत नाहीत तोवर त्यांनी शिवसेना सोडली आहे, असे आम्ही मानत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.