Uddhav Thackeray on Narendra Modi: नरेंद्र मोदी यांची गुर्मी विधानसभेला उतरवतो- उद्धव ठाकरे

या निवडणुकीत त्यांची उरलीसुरली गुर्मी उतरवतो. भाजप (BJP) म्हणजे चोरांचा पक्ष आहे. त्यांना आपण असे नडलो आहोत की, थेट मोदी आणि अमित शाह (Amit Shah) यांनाही घाम फुटला, अशा थेट शब्दांमध्ये शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजवर टीका केली आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विधानसभा निवडणूक 2024 (Assembly Election 2024) मध्ये प्रचारासाठी महाराष्ट्रात यावे. या निवडणुकीत त्यांची उरलीसुरली गुर्मी उतरवतो. आपण सरळ असतो तेव्हा सरळ वाकड्यात गेला की, तोडू. भाजप (BJP) म्हणजे चोरांचा पक्ष आहे. त्यांना आपण असे नडलो आहोत की, थेट मोदी आणि अमित शाह (Amit Shah) यांनाही घाम फुटला, अशा थेट शब्दांमध्ये शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. याच वेळी त्यांनी 'एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन' अशा थेट शब्दांमध्ये त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही इशारा दिला आहे.

मोदी, शाह यांना घाम फुटला

विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) पक्षाच्या मुंबईतील शाखाप्रमुखांचा मेळावा मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील भाषा काहीशी टोकदार होती. या वेळी त्यांनी भाजप, नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. मला आणि आदित्य ठाकरे यांना अडकविण्यासाठी ना ना तऱ्हेचे प्रयत्न केले. अनेक सहकाऱ्यांवर दबाव टाकला, असे असतानाही आम्ही त्यांना झुकलो नाही. त्यामुळेच मोदी, शाह यांना घाम फुटला, असा घणाघात ठाकरे यांनी केला. (हेही वाचा, Aaditya Thackeray-Uddhav Thackeray यांना खोट्या प्रकरणांत अडकवा, तपास यंत्रणांसमोर जबाब देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांकडून अनिल देशमुखांवर दबाव असल्याचा श्याम मानव यांच्याकडून खळबळजनक दावा)

आपल्या भूमिकेचे देशभरातून स्वागत

आपण शिवसेना (UBT) पक्ष म्हणून घेतलेल्या भूमकेचे देशभरातून कौतुक झाले. मध्यंतरी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आल्या होत्या. अखिलेश यादव यांचीही भेट झाली. सर्वांनी सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्याला आणखी विजयाची आपेक्षा होती, पण काही ठिकाणी दगाफटका झाला. मुंबईत अमोल किर्तीकर यांचा विजयच झाला आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, Disha Salian Death Case: भाजप आमदार नितेश राणे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; दिसासालियन मृत्यू प्रकरण)

'एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन'

दरम्यान, भाजप म्हणजे चोरांचा पक्ष आहे. त्यांना स्वत:चा कार्यकर्ता निर्माण करता आला नाही. म्हणूनच राजकारणातील ही षंड माणसे इतरांच्या पक्षातील नेत्यांना आयात करतात. इतरांचे पक्ष फोडतात, पक्षांची नावे, चिन्हे पळवतात. नरेंद्र मोदी यांचे भाषण पाहताना आता कीव येते. यांनी 10 वर्षात काय अंडी उबवली का? असा थेट निशाणा उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. याच वेळी 'एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन' असा थेट इशाराही त्यांनी देवेद्र फडणवीस यांना दिला.

उद्धव ठाकरे यांचे सन्मान राखून आव्हान स्वीकारले- प्रसाद लाड

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतूलन बिघडले आहे. त्यामुळे ते अशी वक्तव्ये करत आहेत. ते देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत आहेत. त्यांनी आव्हान द्यावे इतका देवेंद्र फडणवीस छोटा माणूस नाही. त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात फेसबुक लाईव्ह करण्यापलीकडे काहीही केले नाही. त्यामुळे त्यांचा पक्ष आणि चिन्हही निघून गेले. त्यामुळे उरलेल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ते अशी विधाने करत आहेत. आम्ही त्यांना त्याच पद्धतीने त्यांचा सन्मान राखून उत्तर देऊ. त्यांचे आव्हान आम्ही स्वीकारत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे.