ठाकरे कुटूंबांवर 'विकृत' टीका होत असताना गप्प का होतात? बंडखोर शिवसेना आमदारांवर उद्धव ठाकरे बरसले

तर 11 जुलैला जे न्याय्य असेल ते होईल आणि ते मान्यही असेल असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

शिवसेनेमध्ये बंडाखोरी झाल्यानंतर आमदारांसोबतच काही भागांत पदाधिकारी आणि माजी नगरसेवक शिंदेगटाला जाऊन मिळत असल्याने समान्य शिवसैनिकांमध्ये बैचेनी वाढत आहे. दरम्यान यावरूनच निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. दरम्यान शिवसेना हा पक्ष आणि विधिमंडळामधील गट हे दोन वेगळे आहेत आणि काही ठराविक आमदार वेगळे झाले म्हणून पक्ष संपत नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांचा देखील समाचार घेतला आहे. हे देखील नक्की वाचा: Thane पाठोपाठ नवी मुंबईतही शिवसेनेला खिंडार; 32 माजी नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या भेटीला .

उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना सुनावताना ज्यांनी ठाकरे कुटुंबावर विकृत भाषेत टीका केली त्यांच्याकडून स्वागत स्वीकरता, गळाभेटी घेता हे तुम्हांला पटतं कसं असा सवाल विचारला आहे. आज भाजपासोबत गेल्यानंतरही तुम्ही काही 'प्रेम' जपत असल्याने आम्ही 'धन्य' झाले आहोत मग आता इतकं बोलणार्‍यांची दातखिळी ठाकरे कुटुंबावर आरोप होताना बसली होती का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

दरम्यान मातोश्रीवर सन्मानाने बोलावण्याच्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी सूरत मधून बोलण्यापेक्षा इथेच बसून बोलला असतात तर ते अधिक योग्य ठरलं असतं असे देखील म्हटलं आहे.

धनुष्यबाण ही शिवसेनेची निशाणी शिवसेनेसोबतच राहणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तर 11 जुलैला जे न्याय्य असेल ते होईल आणि ते मान्यही असेल असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान शिवसेना पक्षाकडून 16 अपात्र आमदारांवर कारवाई केली होती त्याच्याविरोधात प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. आता 11 जुलैला त्यावर सुनावणी होणार आहे. हिंमत असेल तर निवडणूकीला सामोरे जा. ज्यांची बाजू योग्य असेल त्यांच्या बाजूने जनता कौल देईल आणि विनासायास सार्‍याच गोष्टींचा निवाडा होईल असे म्हणत पुन्हा ठाकरेंनी भाजपासह बंडखोरांना आव्हान दिले आहे.

शिवसेनेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी आजपासून आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेवर निघाले आहेत. तर संजय राऊत मध्ये नाशिक मध्ये दाखल झाले आहेत.