'इंधनाचा भडका उडाला की, आंतरराष्ट्रीय भाषा ; एरवी ‘मन की बात’हे बरोबर नाही'
त्यामुळे तेलाचे आंतरराष्ट्रीय अर्थकारण त्यांनी पाहावे. आम्हाला जनतेच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा आहे
मुंबई: जागतिक घडामोडींचा हवाला देत इंधन दरवाढ कमी करण्याच्या जबाबदारीतून सत्ताधाऱ्यांनी अंग काढून घेऊ नये. इंधनाचा भडका उडाला म्हणून आंतरराष्ट्रीय भाषा आणि एरवी ‘मन की बात’ हे बरोबर नाही. पंतप्रधान मोदी यांचा आंतरराष्ट्रीय संचार मोठा आहे. त्यामुळे तेलाचे आंतरराष्ट्रीय अर्थकारण त्यांनी पाहावे. आम्हाला जनतेच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकार आणि पर्यायाने पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.
सरकारने वेळ दवडू नये
देशात आणि राज्यात विविध ठिकाणी प्रति लीटर शंभरीपार गेलेले पेट्रोल आणि कमीअधिक पातळीवर त्याच प्रमाणात असलेले डिजेलचे भाव, देशात क्षणाक्षणाला वाढत असलेली महागाई यावरून शिवसेनेने सरकारवर टीकस्त्र सोडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनात संपादकीय लिहिले आहे. 'हात कसले झटकताय!' या मथळ्याखाली लिहिललेल्या या संपादकियात 'पंतप्रधान मोदी यांचा आंतरराष्ट्रीय संचार मोठा आहे. त्यामुळे तेलाचे आंतरराष्ट्रीय अर्थकारण त्यांनी पाहावे. आम्हाला जनतेच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा आहे . सरकारला त्यासाठी शर्थ करावी लागेल. सरकारने वेळ दवडू नये. महागाईच्या झळा कशा विझतील, इंधन दरांचा भडका कसा शांत होईल हे पाहावे. ते करायचे सोडून त्यावरून हात कसले झटकताय? लोकांनी सत्ता मिळवून दिली ती काही अशा प्रश्नावरून हात झटकण्यासाठी नाही!, अशा शब्दात आपल्या सत्ताधारी मित्रपक्षाला सुनावले आहे.
...तर पालघर पोटनिवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता
दरम्यान, इंधन दरवाढीवरून विरोधकांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. विरोधकांनी बंदची तयारी नीट केली नव्हती किंवा बंद यशस्वी करणारी यंत्रणा हाताशी नव्हती. पुन्हा लोकांचे मन ते वळवू शकले नाहीत. त्यामुळे फसफसलेल्या बंदचे खापर त्यांनी शिवसेनेवर फोडले व स्वतःच्या जबाबदारीच्या काखा वर केल्या. ‘बंद’बाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी वगैरे असल्याची टाळी काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी वाजवली आहे. चव्हाणांनी या विषयावर न बोललेलेच बरे. त्यांना बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना हवी, पण पालघरच्या पोटनिवडणुकीत त्यांना भाजपविरोधी एकजुटीचे वावडे होते. काँग्रेस किंवा डाव्यांनी तेथे उमेदवार उभा केला नसता तर भंडारा-गोंदियाप्रमाणेच पालघरचा निकालही वेगळा लागला असता, अशी खंतही ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे. ठाकरे यांच्या या विधानामुळे कालच्या बंदमध्ये शिवसेना सहभागी झाली नाही याचे हेच तर कारण नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे.