उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर आशिष शेलार यांचा टोला, "आता प्रभू श्रीरामांना सुद्धा सरकार फसवतंय" म्हणत केले 'असे' ट्विट

यापूर्वी पहिले मंदिर आणि मग सरकार अशी घोषणा देणारी शिवसेना आता पहिले सरकार आणि मग मंदिर अशा भूमिकेला स्वीकारत आहे, अशा आशयाचे हे ट्वीट आहे.

Ashish Shelar Slams Uddhav Thackeray On Ayodhya Visit (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सरकारला 100 दिवस पूर्ण होताच उद्धव ठाकरे हे शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) च्या पदाधिकाऱ्यांसोबत अयोध्या दौरा (Ayodhya Visit) करणार असल्याची माहिती काल, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. मात्र याच माहितीवर शिवसेनेला टोलावत भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar)  यांनी एक खरमरीत ट्विट केले आहे. यापूर्वी पहिले मंदिर आणि मग सरकार अशी घोषणा देणारी शिवसेना आता पहिले सरकार आणि मग मंदिर अशा भूमिकेला स्वीकारत आहे, एक वचनी प्रभू श्रीरामाचे हे असे अनेक वचनी भक्त मतदार, शेतकरी आणि आता थेट रामालाच फसवत आहेत अशा शब्दात शेलार यांनी ट्विट केले आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करताना सुरुवातीला ठाकरे सरकारच्या कामाचे कौतुक केले होते, तसेच आम्ही पाच वर्ष पूर्ण करणारच असा विश्वास देखील त्यांनी दर्शवला होता.

संजय राऊत ट्विट

आशिष शेलार यांचे टोलवणारे ट्विट

दरम्यान, अयोध्या राम मंदिर प्रकरणी निकाल लागताच उद्धव ठाकरे यांनी खास पत्रकार परिषद घेऊन आपण अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली होती, मात्र त्याच वेळी महाराष्ट्रात सत्तासंघर्ष पेटला होता, भाजप- शिवसेना युतीत अंतर्गत वाद, भाजपची साथ सोडून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी करून स्थापलेली महाविकास आघाडी, शपथविधी, हिवाळी अधिवेशन, मंत्रिमंडळ खातेवाटप या सर्व गोष्टी यानंतरच्या काळात अगदी पाठोपाठ आल्या होत्या, साहजिकच यामुळे उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर पडत गेला होता. आणि आता तर थेट ठाकरे सरकारच्या 100 दिवसांच्या पूर्तीनंतरच मग उद्धव ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा ही स्वतःचेच वचन पाळणाऱ्यांचे लक्षण आहे असे विरोधकांचे म्हणणे आहे.