खासदारांचे प्रगतीपुस्तक; शिवसेनेचे अरविंद सावंत ठरले अव्वल, तर उदयनराजे शेवटून पहिले

तर साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले शेवटून पहिले आले आहेत. उदयनराजे आतापर्यंत फक्त 27 टक्केच लोकसभेत हजर राहिले आहेत

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

नुकतेच 16 व्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन पार पडले. या पार्श्वभूमीवर एका खासगी वाहिनीने खासदारांचे प्रगती पुस्तक तयार केले. म्हणजेच लोकसभेमध्ये हजर राहणे, विविध प्रश्न विचारणे, चर्चांमध्ये सहभागी होणे अशा सर्व निकषांवर कोणते खासदार खरे उतरले आहेत हे समोर आले आहे. यामध्ये दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. तर साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) शेवटून पहिले आले आहेत. उदयनराजे आतापर्यंत फक्त 27 टक्केच लोकसभेत हजर राहिले आहेत, तर त्यांनी एकाही चर्चेत भाग न घेता एकही प्रश्न विचारला नाही.

अरविंद सावंत यांच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो भाजपचे किरीट सोमय्या यांचा. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे तर चौथ्या क्रमांकावर सुनील गायकवाड आहेत. पाचव्या क्रमांकावर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आहेत. अरविंद सावंत यांनी लोकसभेत 98 टक्के हजेरी लावत 478 प्रश्न विचारले, तर 286 वेळा चर्चेत सहभाग घेतला. खासदार सुप्रिया सुळे यांनी 1176 प्रश्न विचारात नवा विक्रम केला आहे. याचसोबत त्यांनी 22 खासगी विधेयकेही सादर केली आहेत. (हेही वाचा : लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची मोठी कारवाई, एआयडीएमकेचे 26 खासदार निलंबित)

शेवटून पाच आलेल्या खासदारांमध्ये उदयनराजे (सातारा) पहिले, त्यानंतर अशोक चव्हाण (नांदेड), प्रीतम मुंडे (बीड) संजय जाधव (परभणी) आणि संजयकाका पाटील (सांगली) यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री फक्त 9 वेळा चर्चांमध्ये सहभागी झाले आहेत, तर प्रीतम मुंडे लोकसभेत फक्त 54 टक्केच हजर होत्या.