Maratha Reservation: आंदोलकांवर लाठीमार प्रकरणी संभाजीराजे,उदयनराजे आक्रमक; सरकारला इशारा
संभाजीराजे यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली तर उदयनराजे हे सुद्धा जालन्याला जाणार आहेत. तत्पूर्वी दोन्ही नेत्यांनी आंदोलकांना धीर देऊन राज्य सरकारला इशारा दिला आहे.
मराठा आरक्षण 9Maratha Reservation) आंदोलकांवर जालना (Jalna) येथे झालेल्या लाठीमारावरुन राज्यभरात वातावरण तापले आहे. सर्व स्तरातून पोलीस आणि सरकारच्या या कृतीचा निषेध केला जात आहे. नागरिकांमधूनही तीव्र संताप अनावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) हे देखील या लाठीमारावरुन आक्रमक झाले आहेत. संभाजीराजे यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली तर उदयनराजे हे सुद्धा जालन्याला जाणार आहेत. तत्पूर्वी दोन्ही नेत्यांनी आंदोलकांना धीर देऊन राज्य सरकारला इशारा दिला आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी पोलीसांनी लाठीमार करण्याचे कृत्य कोणाच्या सांगण्यावरुन केले? कोणामुळे हे सर्व घडले हे राज्यासमोर येणे गरजेचं आहे, असे म्हटले आहे. तसेच, या लाठीमार प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उदयनाराजे भोसले यांनी केली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देत म्हटले आहे की, आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनासाठी एकत्र आलेल्या आंदोलकांच्या जमावावर लाठीमार करण्यात आला. पोलिसांनी बंदूकीतून हवेत गोळीबार केला. हे सगळे कोणाच्या सांगण्यावरुन घडले याचा खुलासा तत्काळ करण्यात यावा. अन्यता आपण आणि सरकारविरोधातील जनतेचा रोष मोठ्या प्रमाणावर वाढत जाईल, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे.
उदयनराजे भोसले यांनी पोलीसी कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध करत म्हटले आहे की, राज्य सरकारने तातडीने पावले टाकावीत, आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई करावी. मराठा मोर्चा आंदोलनात आतापर्यंत एकदाही हिंसाचार झाल्याचे पाहायला मिळाले नाही. पण, आता पोलिसांमुळे हे सगळे घडले आहे. या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. आपल्या हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या समाजावर असा हल्ला होणे हे अत्यंत चुकीचे आणि गंभीर आहे. दोषींवर कडक कारवाई करावी, असे उदयनाराजे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केवळ मराठा समाज आंदोलकच नव्हे तर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातूनही पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा तीव्र निषेध केला जातो आहे.