Pune: पुण्यातील इंदापूर कोविड सेंटरमधील एका डॉक्टरासह 2 परिचारिकांना मारहाण, गुन्हा दाखल

देशात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. या संकटकाळात वैद्यकीय कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत.

Beating | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने सर्वांनाच हादरून सोडले आहे. देशात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. या संकटकाळात वैद्यकीय कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, असे असतानाही काही तरूणांनी एका डॉक्टरासह दोन परिचारिकेला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पुण्याच्या (Pune) इंद्रापूर (Indapur) परिसरात घडली आहे. या घटनेनंतर संपू्र्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत चन्नाप्पा रणखांबे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु असताना देखील चंद्रकांत बरे का होत नाहीत? याचा राग मनात धरून चंद्रकांत यांचे चिरंजीव सुनील रणखांबे आणि रवी रणखांबे यांनी कोणालाही न विचारता जबरदस्तीने कोविड सेंटरमध्ये प्रवेश केला आणि 'आमच्या वडिलांवर तुम्ही व्यवस्थित उपचार करत नाहीत' असा आरोप करत डॉ. श्वेता कोडग यांचा हात पिरगळला आणि डाव्या गालावर चापट मारली. तसेच परिचारिका अंजली पवार आणि सोमय्या बागवान यांना देखील मारहाण केली. या मारहाणीत अंजली पवार यांच्या गळ्याला जखम झाल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा-Maharashtra: नागपूर मध्ये लॉडाउनचे नियम ढाब्यावर, मार्केटमध्ये नागरिकांची तुफान गर्दी (See Photos)

पुण्यात घडलेला हा संपूर्ण प्रकार धक्कादायक असून यावर वैद्यकीय प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याप्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी, अशा मागणींनी जोर धरला आहे. याआधीही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर नागरिकांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.