Trupti Desai: शिर्डी साई संस्थानने घेतलेल्या 'या' निर्णयावरून तृत्ती देसाई आक्रमक
यावरून मोठा वाद पेटला आहे. या वादात भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनीदेखील उडी घेतली आहे.
शिर्डीतील साईबाबा मंदिर (Shirdi Saibaba Mandir) येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानाने भाविकांना केली आहे. यावरून मोठा वाद पेटला आहे. या वादात भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनीदेखील उडी घेतली आहे. 'शिर्डी संस्थानने श्री साईबाबा समाधी मंदिराच्या आवारात पेहरावासंदर्भात लावलेला बोर्ड तातडीने काढावा. अन्यथा शिर्डीत येऊन आम्ही तो बोर्ड काढू,' असा थेट इशाराच त्यांनी दिली आहे. तसेच शिर्डी मंदिरामधील पुजारांच्या पोषाखाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
लॉकडाउनच्या काळात बंद असेलली मंदिर् पुन्हा एकदा खुली करण्यात आली असून ठिकठिकाणी दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्या आहेत. शिर्डीमधील साई मंदिरही दर्शनासाठी खुले करण्यात आले असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. दरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तसा फलकच मंदिराबाहेर लावण्यात आला आहे. त्यानुसार, मंदिरात येताना भक्तांनी सभ्य पोषाख परिधान करावा, असे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे. यावर तृप्ती देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे देखील वाचा- शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांनी 'दर्शनाला येताना सभ्य पोषाखात यावे,' अशा आशयाचा लावला फलक
"शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भक्त श्रद्धेने देश-विदेशातून येत असतात. त्यात वेगवेगळ्या जाती-धर्माच्या साईभक्तांचा समावेश असतो. अशावेळी भक्ताने सभ्य पोषाख घालून यावे, अशा पद्धतीचा बोर्ड लावून बंधने घालणे योग्य ठरणार नाही. मंदिरांमधील पुजारी हे अर्धनग्न अवस्थेत असतात. ते फक्त सोवळे नेसतात, त्यावर कधी कोणत्या भक्ताने आक्षेप घेतला नाही वा अर्धनग्न पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असा बोर्डही लावला नाही", असेही तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र टाईम्सने वृत्त दिले आहे.
शिर्डी साईबाबा मंदिरात कोरोना महामारीच्या दरम्यान विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. ऑनलाईन पद्धतीने दर्शनासाठी पास घ्यावा लागणार आहे. ठरवून देण्यात आलेली वेळ आणि तारखेनुसार भाविकांना दर्शन दिलं जाणार आहे. 3000 भाविकांना ऑनलाईन पेड पास दिला जाणार आहे. इतर वेळी आरतीसाठी 250 ते 300 भाविक उपस्थित असत. मात्र यावेळी आरतीसाठी 50 जणांनाच सहभागी होता जाणार आहे. आरतीसाठी पास आरक्षित असणार आहे.