Train Alarm Chain: रेल्वेमधील अलार्म चेनच्या गैरवापरामुळे मध्य रेल्वेच्या तब्बल 2300 लोकल गाड्या उशिराने धावल्या
यापैकी 53 प्रकरणे वैध कारणांमुळे न्याय्य म्हणून नोंदवण्यात आली आहेत, तर 279 प्रकरणांमध्ये महत्वाचे कारण दिसून आले नाही
लांब पल्ल्याच्या ट्रेनमधील अलार्म चेनच्या (Alarm Chains) गैरवापरामुळे लोकल ट्रेनच्या (Local Train) वेळेवरही परिणाम होत आहे. एप्रिल 2022 मध्ये मुंबई विभागातील उपनगरीय विभागात लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील चेन पुलिंगमुळे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील सुमारे 2300 लोकल गाड्यांना 15 मिनिटांपर्यंत उशीर झाला. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गार्ड आणि लोको पायलट यांच्याशी संवाद साधण्यासाठी या साखळ्या दिल्या जातात, परंतु प्रवासी त्याचा गैरवापर करत आहेत. यामध्ये उशीर झालेल्या सहप्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यास मदत करण्यासाठी, ट्रेनमधून खाली पडलेले मोबाईल फोन घेण्यासाठी, स्थानकांवर अन्न/पाणी खरेदी करण्यासाठी उतरलेले प्रवासी वेळेत पोहचू न शकल्याने त्यांना मदत करण्यासाठी, ट्रेनमध्ये चढण्यास उशीर झालेल्या सह प्रवाशासाठी किंवा स्थानकावर काही सामान विसरले असल्यास ते परत घेण्यासाठी लोक ट्रेनमधील साखळ्या ओढतात.
गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि उन्हाळ्याच्या हंगामात प्लॅटफॉर्मवरील गाड्यांमधील अलार्म चेन पुलिंग प्रकरणांचा गैरवापर रोखण्यासाठी, मध्य रेल्वेने तात्पुरता उपाय म्हणून प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत 10 रुपयांवरून 50 रुपये केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांवर 15 दिवसांसाठी म्हणजे 9 मे ते 23 मे 2022 पर्यंत हे दर लागू असतील.
मुंबई विभागात प्रामुख्याने कल्याण, एलटीटी आणि ठाणे स्थानकांवर चेन पुलिंगच्या जास्त घटना घडल्या आहेत. ही महत्त्वाची मेन लाइन स्टेशन आहेत जिथे बहुतेक गाड्या थांबतात. या स्थानकांच्या क्रॉसिंग पॉईंट्सवर ट्रेन सुरू झाल्यानंतर चेन पुलिंग झाल्यास, ट्रेन इतर मार्गांना देखील ब्लॉक करते, ज्यामुळे विशेषत: सकाळ आणि संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये लोकल ट्रेनच्या वक्तशीरपणावर वाईट परिणाम होतो. ट्रेनमधील साखळी ओढल्याने त्या विशिष्ट ट्रेनच्या धावण्यावरच परिणाम होत नाही, तर तिच्या मागे धावणार्या गाड्यांवरही त्याचा परिणाम होतो. (हेही वाचा: Summer Specials Trains: प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून 626 उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा)
1 एप्रिल 2022 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत मुंबई विभागात अलार्म चेन पुलिंगची एकूण 332 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यापैकी 53 प्रकरणे वैध कारणांमुळे न्याय्य म्हणून नोंदवण्यात आली आहेत, तर 279 प्रकरणांमध्ये महत्वाचे कारण दिसून आले नाही. भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार एकूण 188 गुन्हेगारांवर पुरेसे किंवा वैध कारणाशिवाय अलार्म चेन ओढल्याबद्दल खटला दाखल करण्यात आला आहे आणि रु. 94,000/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे. जर कारणास्तव रेल्वेमधील साखळी ओढली तर त्यासाठी, रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 141 नुसार, एक महिना तुरुंगवास किंवा रु 1,000 पर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.