Alphonso Mango On EMI: आधी खा, नंतर पैसे द्या!पुण्यातील व्यापारी ईएमआयवर विकतोय 'हापूस' आंबा
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सणस यांनी दावा केला की, त्यांच्या कुटुंबाचे ईएमआयवर आंबे विकणारे देशातील पहिले दुकान आहे.
Alphonso Mango On EMI: देशात फळांच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका व्यावसायिकाने अल्फोन्सो आंब्याची (Alphonso Mango) विक्री वाढवण्याचा अभिनव मार्ग शोधला आहे. पुण्यातील एका व्यापाऱ्याने अल्फोन्सो आंबा ईएमआयवर (EMI) विकण्याचा निर्णय घेतला आहे. अल्फोन्सो आंब्याच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन व्यापाऱ्याने हे पाऊल उचलले आहे. अल्फोन्सो आंब्याच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे त्याची विक्री घटली आहे. त्यामुळे, पुण्यातील एका व्यापाऱ्याने फळांचा राजा आंबा, समान मासिक हप्ते किंवा EMI वर ऑफर केला आहे.
गुरुकृपा ट्रेडर्स अँड फ्रूट प्रॉडक्ट्सचे गौरव सणस यांनी सांगितलं की, जर रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर हप्त्यांवर विकत घेता येतात तर आंबा का नाही. राज्यातील कोकण विभागातील देवगड आणि रत्नागिरी येथील अल्फोन्सो किंवा 'हापूस' आंबा किरकोळ बाजारात सध्या 800 ते 1300 रुपये प्रति डझन दराने विकला जात आहे. (हेही वाचा - Alphanso Mango: अबब! यंदाच्या हंगामातील आंब्याच्या पहिल्या पेटीला ५१ हजारांचा भाव, राज्यातील सर्वात उच्चांकी दर)
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सणस यांनी दावा केला की, त्यांच्या कुटुंबाचे ईएमआयवर आंबे विकणारे देशातील पहिले दुकान आहे. हंगामाच्या सुरुवातीला दर नेहमीच जास्त असतात. आम्ही विचार केला की जर रेफ्रिजरेटर, एसी आणि इतर वस्तू ईएमआयवर खरेदी करता येतात तर आंबा का नाही? त्यामुळे प्रत्येकजण EMI वर आंबा खरेदी करू शकतो.
सणस यांच्या आउटलेटवरून EMI वर फळे खरेदी करण्याची प्रक्रिया मोबाईल फोन खरेदी करण्यासारखीच आहे. ग्राहकाला क्रेडिट कार्ड वापरणे आवश्यक आहे आणि खरेदीची रक्कम तीन, सहा किंवा 12 महिन्यांच्या ईएमआयमध्ये रूपांतरित केली जाते. ही योजना 5,000 रुपयांच्या किमान खरेदीसाठी उपलब्ध आहे. आतापर्यंत चार ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचं सणस यांनी सांगितलं आहे.