Titwala Block Phase 2: मध्य रेल्वेच्या टिटवाळा ब्लॉकचा दुसरा टप्पा 2 सप्टेंबरपासून; लोकल सह लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम
मध्य रेल्वेने टिटवाळा फलाट विस्तारीकरणासाठीच्या १५ दिवसांच्या विशेष ब्लॉकचा दुसरा टप्पा २ ते ९ सप्टेंबर या कालावधीत दररोज मध्यरात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत राबवण्याची घोषणा केली असून, यामुळे अनेक लोकल तसेच मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहेत.
मध्य रेल्वेकडून (Central Railway) सध्या टिटवाळा स्थानकातील (Titwala Railway Station) फलाट विस्तारीकरणाचं काम सुरू आहे. या कामासाठी मध्य रेल्वेने सुरू केलेल्या 15 दिवसांच्या विशेष ब्लॉकचा दुसरा टप्पा 2/3 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून 8/9 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत राबवला जाणार आहे. या कालावधीत दररोज रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत अप आणि डाऊन नॉर्थ-ईस्ट मार्गांवर ब्लॉक घेतला जाणार आहे. 8/9 सप्टेंबरनंतरच्या ब्लॉकबाबतची सविस्तर माहिती मध्य रेल्वेकडून लवकरच जाहीर केली जाणार आहे. ही देखभाल कामे पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचे सांगत रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिटवाळा-कसारा दरम्यान सेवा बंद
2/3 सप्टेंबर आणि 4/5 ते 8/9 सप्टेंबर या कालावधीत टिटवाळा आणि कसारा दरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाहीत. 11 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टिटवाळाकडे जाणाऱ्या सर्व लोकल सेवा असंगावपर्यंत वाढवण्यात येणार असून, टिटवाळाहून सुटणाऱ्या गाड्याही असंगावहूनच सुटतील.
रद्द होणाऱ्या डाऊन आणि अप सेवा
डाऊन मार्गावर सीएसएमटीहून रात्री 10 आणि 10.50 वाजता सुटणाऱ्या टिटवाळा लोकल, सकाळी 10 आणि रात्री 8.41 च्या कुर्ला लोकल, तसेच रात्री 10.47 आणि 12.08 वाजताच्या कसारा लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी 8.08 वाजताची सीएसएमटी-ठाणे लोकलही रद्द राहणार आहे.
अप मार्गावर टिटवाळाहून सकाळी 6.13, रात्री 9 आणि 10.06 वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच ठाणे, कल्याण आणि कसारा येथून सुटणाऱ्या काही सेवाही या यादीत आहेत.
अल्प-मार्गावर संपुष्टात येणाऱ्या आणि सुरू होणाऱ्या गाड्या
रात्री 11.16 आणि 11.42 वाजता सीएसएमटीहून सुटणाऱ्या टिटवाळा लोकल ठाणे येथेच संपुष्टात आणल्या जातील. तर पहाटे 3.56 आणि 4.32 वाजता टिटवाळाहून सुटणाऱ्या सीएसएमटी लोकल आता ठाणे येथूनच अनुक्रमे 4.44 आणि 5.19 वाजता सुरू होतील.
3 सप्टेंबरच्या रात्री अतिरिक्त बदल
3/4 सप्टेंबरच्या रात्रीही टिटवाळा-कसारा दरम्यान सेवा बंद राहणार असून, या रात्री रद्द होणाऱ्या आणि मार्गबदल होणाऱ्या गाड्यांची यादी थोडी वेगळी आहे. कल्याण-असंगाव लोकल आणि कुर्ला-टिटवाळा लोकलच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत.
3 ते 9 सप्टेंबर या कालावधीत अनेक सेवा ठाणे किंवा कल्याणपर्यंतच मर्यादित राहणार आहेत, यामध्ये सकाळी 6.30 वाजताची सीएसएमटी-टिटवाळा एसी लोकल आणि दुपारी 3.33 वाजताच्या दादर-टिटवाळा एसी सेवेचा समावेश आहे.
मेल-एक्सप्रेस गाड्यांचेही वेळापत्रक बदलणार
या ब्लॉक कालावधीत एलटीटी-पाटलीपुत्र एक्सप्रेस, सीएसएमटी-अमृतसर एक्सप्रेस, एलटीटी-पुरी एक्सप्रेस यांसह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. तसेच वासिंद, आटगाव, खर्डी, कसारा आणि इगतपुरी येथे विविध एक्सप्रेस गाड्या नियमित केल्या जाणार आहेत. भुसावळ विभागातील डझनभर गाड्याही नियमनाच्या कक्षेत आहेत.
लिंगमपल्ली-सीएसएमटी देवगिरी एक्सप्रेस, हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगलादीप एक्सप्रेससह काही गाड्या 30 ते 40 मिनिटे उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे.