Tipu Sultan Row: 'क्रीडा संकुलाचे अधिकृत नाव अद्याप निश्चित झालेले नाही'; टिपू सुलतानच्या नावासंबंधी वादावर Minister Aaditya Thackeray यांची माहिती

आज या उद्यानातील क्रीडा संकुलाचे उद्घाटन होणार होते, ज्यासाठी शेख उपस्थित असताना भारतीय जनता युवा मोर्चा, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नामांतराची मागणी करत कार्यक्रमस्थळी निदर्शने केली

Aaditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

18 व्या शतकातील म्हैसूरचा शासक टिपू सुलतान (Tipu Sultan) याच्या नावावरून मुंबईतील मालाड येथील क्रीडा संकुलाला नाव दिल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) या नामकरणाचा निषेध केला आहे. भाजपचे म्हणणे आहे की, ज्या राज्यकर्त्याने हिंदूंचा छळ केला त्याचे नाव सार्वजनिक सुविधेसाठी अस्वीकार्य आहे. आज याबाबत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले. आता महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, क्रीडा संकुलाचे अधिकृत नाव अद्याप निश्चित झालेले नाही.

पत्रकारांशी बोलताना मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, ‘प्रकल्पांची अधिकृत नावे निश्चित करणे हे बीएमसीच्या अखत्यारीत येते आणि अजूनतरी महापालिकेसमोर असा प्रस्ताव आलेला नाही. महापौर म्हणाले की त्या संकुलाचे अधिकृत नाव अद्याप निश्चित झालेले नाही.’ याबाबत बोलताना महाराष्ट्र मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले की, उद्यानाला आधीपासूनच टिपू सुलतानचे नाव होते आणि आम्ही कोणतेही नवीन नामकरण केले नाही.

शेख म्हणाले, ‘गेल्या 15 वर्षांपासून ही बाग टिपू सुलतानच्या नावाने ओळखली जात आहे. परंतु आजतागायत कोणीही त्यावर आक्षेप घेतला नाही. मी एका भाजप आमदाराला ओळखतो जो या भागातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दबाव टाकत आहे, ज्याचे नाव टिपूच्या नावावर आहे. मात्र आमदाराला मते हवी आहेत म्हणून तो सोयीस्करपणे रस्त्याच्या नावाबाबत मौन बाळगून आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘सध्याच्या बागेच्या नूतनीकरणाचा एक भाग म्हणून, टेनिस आणि बॅडमिंटन कोर्ट बांधले गेले आहेत आणि ते धर्म किंवा जातीची पर्वा न करता सर्वांसाठी खुले आहेत.’ (हेही वाचा: मुंबईमध्ये टिपू सुलतानच्या नावावरून गदारोळ; बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अटक, Aslam Shaikh म्हणतात- BJP ने देशाची बदनामी करण्यासाठी गुंड पाठवले)

आज या उद्यानातील क्रीडा संकुलाचे उद्घाटन होणार होते, ज्यासाठी शेख उपस्थित असताना भारतीय जनता युवा मोर्चा, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नामांतराची मागणी करत कार्यक्रमस्थळी निदर्शने केली. पोलिसांनी कार्यक्रमापूर्वी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.