Tipu Sultan Row: मुंबईमध्ये टिपू सुलतानच्या नावावरून गदारोळ; बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अटक, Aslam Shaikh म्हणतात- BJP ने देशाची बदनामी करण्यासाठी गुंड पाठवले
भारतीय जनता पक्षावर (BJP) टीका करताना, काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, ‘गेल्या 70 वर्षांत टिपू सुलतानच्या नावावरून कोणताही संघर्ष झाला नाही, आज भाजपने देशाची बदनामी करण्यासाठी आपले गुंड पाठवले आहेत'
मायानगरी मुंबईतील (Mumbai) एका क्रीडा संकुलाला देण्यात येत असलेल्या टिपू सुलतानच्या (Tipu Sultan) नावावरून गदारोळ सुरू आहे. बुधवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील मालाड, मालवणी परिसरात बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. टिपू सुलतानच्या नावाचा विरोध करण्यासाठी क्रीडा संकुलाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते पोहोचले होते. मालवणी परिसरातील टिपू सुलतान क्रीडा संकुलाचे आज उद्घाटन होणार होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) येणार होते, मात्र गदारोळामुळे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. मालवणी हा अस्लम शेख यांचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि याठिकाणी मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे.
याबाबत भारतीय जनता पक्षावर (BJP) टीका करताना, काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, ‘गेल्या 70 वर्षांत टिपू सुलतानच्या नावावरून कोणताही संघर्ष झाला नाही, आज भाजपने देशाची बदनामी करण्यासाठी आपले गुंड पाठवले आहेत आणि नामकरण प्रकल्पांवर गदारोळ माजवून देशाचा विकास थांबवला जात आहे. आम्हाला नामकरणावरून वादात पडण्याची गरज नाही.’
याआधी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीदेखील मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानच्या नावावरून विरोध दर्शविला होता. एएनआयशी बोलताना भातखळकर म्हणाले, ‘शिवसेनेचे हिंदुत्व हे बोगस आहे. ते केवळ निमित्त साधून हिंदुत्वाच्या गप्पा मारतात. मालाडच्या मैदानाचे टिपू सुलतानच्या नावावरून नामकरण त्यांना चांगलेच ठाऊक आहे. परंतु याच्या विरोधात आमच्या आम्ही इतर भाजप नेत्यांसोबत धरणे आयोजित करून या उद्घाटनाला विरोध करू. आम्ही हे होऊ देणार नाही आणि आम्ही वचन देतो की बीएमसीमध्ये आमची सत्ता आल्यास आम्ही या मैदानाचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर ठेऊ.’ (हेही वाचा: रेल्वे परीक्षा कधीत गैरप्रकारावरुन बिहारमधील गया येथे अज्ञातांकडून ट्रेनची तोडफोड)
ते पुढे म्हणाले, ‘शिवसेनेचा नवा चेहरा मुंबईकरांना आता चांगलाच ठाऊक आहे. ते केवळ सत्तेत राहण्यासाठी असे करत आहेत. अस्लम शेख हा तोच व्यक्ती आहे ज्याने दहशतवादी याकुब मेमनच्या पाठिंब्यासाठी पत्र लिहिले होते.’ दरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर म्हणाले की, ‘टिपू सुलतानच्या नावाने संकुलाचे नामकरण शहरातील शांतता भंग करण्याच्या उद्देशाने केले जात आहे.’
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)