Skymet Monsoon Forecast in Maharashtra: यंदा भारतात मान्सून सामान्यापेक्षा कमी राहणार; मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा एकदा दुष्काळजन्य परिस्थिती उद्धभवण्याची शक्यता

खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटने सोमवारी सांगितले की, 2023 मध्ये भारतात "सामान्यपेक्षा कमी" मान्सून पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Monsoon | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Skymet Monsoon Forecast in Maharashtra: देशाच्या उत्तर आणि मध्य भागात पावसाची कमतरता असण्याचा धोका स्कायमेट (Skymet) ने व्यक्त केला आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत अपुरा पाऊस पडणार आहे. खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटने सोमवारी सांगितले की, 2023 मध्ये भारतात "सामान्यपेक्षा कमी" मान्सून पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, एल निनोच्या पुनरागमनामुळे यंदा मान्सून कमकुवत असेल.

उप-मान्सूनचा पूर्वीचा दृष्टीकोन कायम ठेवत, स्कायमेटने म्हटलं आहे की, भारतात मान्सूनचा पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 94% असेल. राज्य-संचालित भारतीय हवामान विभाग लवकरच आपला वार्षिक मान्सून अंदाज जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. भारतातील जवळपास निम्मी शेतजमीन ही पावसावर अवलंबून असते. मान्सून सामान्यापेक्षा कमी राहिल्याने याचा भात, मका, ऊस, कापूस आणि सोयाबीन यांसारख्या पिकांवर परिणाम होणार आहे. (हेही वाचा - Maharashtra Unseasonal Rain: राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान)

देशाच्या उत्तर आणि मध्य भागांना पावसाच्या कमतरतेचा धोका असण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे. उत्तर भारतातील कृषी क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये हंगामाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञाने दिली आहे.

दरम्यान, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे भारताच्या सुपीक उत्तर, मध्य आणि पश्चिम मैदानी भागात गव्हासारख्या काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. हजारो शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे.