Raj Thackeray On PM Modi: हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभत नाही; जागतिक मराठी संमेलनात राज ठाकरे यांची भाजपवर जहरी टीका
आपण गुजरातचे आहोत म्हणून फक्त गुजरातला प्राधान्य देणं योग्य नाही. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोभत नाही, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray On PM Modi: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान मोदींवर अत्यंत जहरी शब्दांत भाष्य केलं आहे. महाराष्ट्र हे श्रीमंत राज्य आहे. एखादा दुसरा उद्योग बाहेर गेल्याने राज्याचे फार नुकसान होणार नाही. आपण गुजरातचे आहोत म्हणून फक्त गुजरातला प्राधान्य देणं पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) शोभत नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी मोदींवर टीकास्त्र डागलं.
पिपंरी चिंचवडमध्ये (Pipnri Chinchwad) येथे 18 वे जागतिक मराठी संमेलन (Jagtik Marathi Sammelan) भरवण्यात आले आहे. यात राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी देशातील सध्याच्या स्थितीवर बोट ठेवलं. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, सध्या देशातील परिस्थिती लयास गेली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणांवरून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. यात महापुरुषांना खेचलं जात आहे. (हेही वाचा -Sanjay Raut On Union Ministers: केंद्रीय मंत्र्यांबद्दल बोलताना पुन्हा घसरली संजय राऊत यांची जीभ)
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त एका राज्याकडे पाहु नये. हे मी 2014 ला देखील म्हणालो होतो. आजही माझी तीच भूमिका आहे. राजकारण चांगले बदल व्हायला हवेत. एकमेकांच्या विरोधात बसलेले एकत्र कसे आले? पहाटे शपथविधी घेतात ते नंतर का बदलतात? असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे.
एखाद्या भूमिकेला राजकारणात विरोध करणे चुकीचे नाही. चांगले काम केले तर त्यांचे कौतुक केले पाहिजे. मी यापूर्वी सरकारच्या चांगल्या गोष्टीचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक राज्याकडे समान बघितले पाहिजे. आपण गुजरातचे आहोत म्हणून फक्त गुजरातला प्राधान्य देणं योग्य नाही. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोभत नाही, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.
यापूर्वीचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे पंजाबी होते. मग त्यांनी काय फक्त पंजाबचचं पाहावं का? उद्या आसामचा कोणीतरी पंतप्रधान होईल, त्यांनी तसंच करायचं का? राजकारण म्हणजे फक्त निवडणुका जिंकणं नाही. राजकारणाला सामाजिक कामाचा आधार लागतो, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.