Iron Bridge Stolen In Mumbai: मुंबईत 6 हजार किलो वजनाच्या लोखंडी पुलाची चोरी; उत्पादक कंपनीचे कामगारचं निघाले चोर, चौघांना अटक
26 जून रोजी तात्पुरता पूल बेपत्ता असल्याचे आढळून आल्याने वीज कंपनीने पोलिसांत तक्रार दाखल केली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
Iron Bridge Stolen In Mumbai: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शहराच्या पश्चिम उपनगरातील नाल्यावरील 6,000 किलोचा लोखंडी पूल (Iron Bridge) चोरल्याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. बांगूर नगर पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मालाड (पश्चिम) मध्ये 90 फूट लांबीची मेटल स्ट्रक्चर युटिलिटी कंपनी अदानी इलेक्ट्रिसिटीने प्रचंड इलेक्ट्रिक केबल्स पास करण्यासाठी लावली होती.
नाल्यावर कायमस्वरूपी पूल बांधल्यानंतर काही महिन्यांपूर्वी या भागातील तात्पुरती रचना अन्य ठिकाणी हलविण्यात आली. 26 जून रोजी तात्पुरता पूल बेपत्ता असल्याचे आढळून आल्याने वीज कंपनीने पोलिसांत तक्रार दाखल केली, असे अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा - Maharashtra Govt Faces Contempt Petition: डान्सबारमध्ये सार्वजनिक नैतिकता न पाळल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारविरोधात अवमान याचिका दाखल)
ज्या कंपनीला पूल बांधण्याचे कंत्राट देण्यात आले होते, त्या कंपनीच्या कामगारांवर चोरीचा आरोप होता. तपासादरम्यान पोलिसांना असे आढळून आले की, हा पूल शेवटचे 6 जून रोजी पाहिले होते. घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे पोलिसांनी आजूबाजूच्या भागात बसवलेल्या पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले आहेत.
दरम्यान, 11 जून रोजी एक मोठे वाहन पुलाच्या दिशेने जाताना आढळले, असे अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर पोलिसांनी वाहनाचा नोंदणी क्रमांकावरून शोध घेतला. वाहनात गॅस कटिंग मशीन होती, ज्याचा उपयोग पूल पाडण्यासाठी आणि 6,000 किलो वजनाचे लोखंड चोरण्यासाठी करण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
तथापी, अधिक तपास केल्यानंतर पोलिसांनी पुलाच्या बांधकामाचे कंत्राट दिलेल्या कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचा शोध घेतला. अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी गेल्या आठवड्यात कर्मचारी आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली होती. घटनास्थळावरून चोरीचे साहित्य जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.