Sessions Court On Traffic Police: वाहतूक पोलिसांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीच्या चाव्या काढून घेण्याचा अधिकार नाही; मुंबई सत्र न्यायालयाचा महत्त्पूर्ण निर्णय
एवढेच नव्हे तर वाहन चालविण्याचा परवाना दिल्यानंतर दुचाकी चालकाला दंड वसूल करण्यासाठी पोलिस ठाण्यात येण्याची सक्ती करता येणार नाही, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
Sessions Court On Traffic Police: मुंबई सत्र न्यायालयाने (Bombay Sessions Court) वाहतूक पोलिसांना (Traffic Police) फटकारले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीच्या चाव्या काढून घेण्याचा वाहतूक पोलिसांना अधिकार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सत्र न्यायालयाने दिला आहे. तसेच, वाहन चालविण्याचा परवाना दिल्यानंतर दुचाकी चालकाला दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिस ठाण्यात येण्याची सक्ती करता येणार नाही, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केलं आहे.
अधिकृत कर्तव्यात अडथळा आणणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली वाहतूक पोलिसांनी एका तरुणाला अटक केली होती. सबळ पुराव्याअभावी मुंबई सत्र न्यायालयाने संबंधित तरुणाची निर्दोष मुक्तता केली. या वेळी न्यायालयाने वाहतूक पोलिसांकडून दंड वसूल करण्याच्या पद्धतीवर ताशेरे ओढले. दंड वसुलीतील त्रुटींकडे बोट दाखवत सत्र न्यायालयाने वाहतूक पोलिसांना मोठा दणका दिला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीची चावी काढून घेण्याचा वाहतूक पोलिसांना अधिकार नाही. एवढेच नव्हे तर वाहन चालविण्याचा परवाना दिल्यानंतर दुचाकी चालकाला दंड वसूल करण्यासाठी पोलिस ठाण्यात येण्याची सक्ती करता येणार नाही, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. (हेही वाचा - Sanjay Raut Allegation On Abdul Sattar: मेडिकल कॉलेज बांधण्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बळजबरीने सैनिकांची जमीन बळकावली; संजय राऊत यांचा आरोप)
प्राप्त माहितीनुसार, कुलाबा परिसरातील एन. S. रस्त्यावरील सिग्नलवर सागर पाठक हा तरुण हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत होता. यावेळी त्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. वाहतूक पोलिस जवळ येत असल्याचे पाहून तरुणाने तात्काळ हेल्मेट घातले. यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून वाहतूक पोलिसांनी संबंधित तरुणावर दंड वसूल करण्याची कारवाई केली. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या कॉन्स्टेबलला तरुणाने मारहाण केल्याचा आरोप वाहतूक पोलिसांनी केला होता.
दरम्यान, कॉन्स्टेबलच्या तक्रारीवरून सागरविरुद्ध भादंवि कलम 332 आणि 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सागरला 25 मे 2017 रोजी अटक करण्यात आली होती. या घटनेचा खटला गेल्या सहा वर्षांपासून सत्र न्यायालयात चालला होता. आरोपी सागरने ड्रायव्हिंग लायसन्स कॉन्स्टेबलकडे जमा केले होते. त्यानंतर त्याला मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी तरुणाने हवालदाराला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला.
तथापी, वाहतूक पोलिसांनी संबंधित तरुणाचा ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केलं होतं. त्यामुळे आरोपीचे नाव, पत्ता कळत होता. त्याआधारे वाहतूक पोलिसांना जुन्या वाहतूक नियमांनुसार कारवाई करता आली असती. परंतु, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना नव्हता. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चलान, पावती प्रक्रिया किंवा नोंदणी क्रमांकाच्या फोटोद्वारे कारवाई केली जाऊ शकते. परवाना जमा केल्यानंतर पोलिस दुचाकीस्वाराला पोलिस ठाण्यात येण्यास भाग पाडू शकत नाहीत. आरोपी ड्रायव्हरने त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स सरेंडर केल्यास त्याला संबंधित अधिकाऱ्यासमोर दंड भरावा लागतो आणि नंतर त्याला परवाना मागे दिला जातो.