Shiv Sena on Al Qaeda threat Letter: अल-कायदाची धमकी म्हणजे 'भाजपने ओढवून घेतलेली बला आहे'; शिवसेनेचा केंद्रावर निशाणा
या लेखात शिवसेनेने म्हटलं आहे, अल कायदा (AQIS) ची धमकी म्हणजे भारतीय जनता पक्षानेचं ओढवून घेतलेली बला आहे.
Shiv Sena on Al Qaeda threat Letter: महाराष्ट्रातील सत्तेत असलेल्या शिवसेनेने (Shiv Sena) आपले मुखपत्र सामना (Saamana) मधून भारतीय जनता पक्ष (BJP) आणि पैगंबर मुहम्मद यांच्यावर वादग्रस्त विधाने करणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना लक्ष्य केले आहे. सामनाच्या संपादकीय लेखात अल कायदा या दहशतवादी संघटनेने दिलेल्या धमकीचा संदर्भ देत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. या लेखात शिवसेनेने म्हटलं आहे, अल कायदा (AQIS) ची धमकी म्हणजे भारतीय जनता पक्षानेचं ओढवून घेतलेली बला आहे.
कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला झाल्यास उद्या राज्य असो की देश, त्यांची जबाबदारी फक्त भाजपची असेल. भाजपमुळे आज देशाला माफी मागायची वेळ आली असून अल कायदासारख्या संघटनांकडून धमक्या येत आहेत, असंही शिवसेनेने अग्रलेखात म्हटलं आहे. (हेही वाचा - Rajya Sabha Elections 2022: मविआला धक्का, नवाब मलिक यांना मुंबई हाय कोर्टात दिलासा नाही; अनिल देशमुख यांच्याबाबतही राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण)
सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षा कोण देणार?
सामनाच्या संपादकीय लेखात पुढे लिहिलं आहे की, भाजप सरकारने नुपूर शर्मा यांना संरक्षण दिले आहे. पण सामान्य नागरिकांचे काय होणार? देशातील सर्वसामान्य जनतेला शेवटी कोण वाचवणार? देश अत्यंत कठीण काळातून जात आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे.
दरम्यान, भाजपने आपल्या दोन प्रवक्त्यांवर कठोर कारवाई केली आहे. परंतु, कुवेत, इराण, मलेशियासह अनेक मुस्लिम देशांव्यतिरिक्त देशातील सर्व विरोधी राजकीय पक्ष याप्रकरणी सरकारवर निशाणा साधत आहेत.