Maharashtra New Government Oath Ceremony: मोठी बातमी! महायुती सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होण्याची शक्यता

2 डिसेंबरला हा भव्य सोहळा आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू असून शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

CM Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Maharashtra New Government Oath Ceremony: विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राच्या नव्या सरकार (Maharashtra New Government) च्या शपथविधीला आणखी चार ते पाच दिवस लागू शकतात. 2 डिसेंबरला हा भव्य सोहळा आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू असून शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. महायुतीमध्ये भाजप, शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी क्राँग्रेसचा समावेश आहे. अद्याप महायुतीत मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार हे समोर आलेलं नाही.

भाजप आणि शिंदे गट शिवसेनेमध्ये नेतृत्वाबाबतच्या मतभेदांमुळे शपथविधीला उशील होत असल्याचं म्हटलं जातं आहे. युतीच्या दणदणीत विजयात त्यांचे नेतृत्व निर्णायक असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवण्यावर शिवसेना नेते ठाम आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील निवडणुका शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या आणि त्यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवल्यास युतीच्या ऐक्याचा आणि नेतृत्वाचा सन्मान होईल. (हेही वाचा -Eknath Shinde यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; सध्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून सांभाळणार जबाबदारी)

दरम्यान, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी द्यावी, असा दावा करत आहेत. विधानसभेत भाजपने सर्वाधिक 132 जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे पक्षातील अनेकांच्या मते फडणवीस राज्य सरकारचे नेतृत्व करण्यासाठी सर्वोत्तम आहेत. तथापी, महायुतीचा एक भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही मुख्यमंत्री पदासाठी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे. (हेही वाचा -Eknath Shinde Thanks Voters: 'राज्यातल्या कॉमन मॅनने सुपरमॅनसारखे मतदान केले, हा विजय सर्वसामान्यांचा आहे;' विधानसभा निवडणुकीतील यशानंतर एकनाथ शिंदेंनी मानले मतदारांचे आभार.)

भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या महायुतीने विधानसभेच्या 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला. विरोधी महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर विजय मिळवता आला. महायुती सरकारला सत्ता स्थापन करण्यात उशीर होत असल्याने महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी विविध अटकळांना उधाण आणलं आहे. परंतु, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत कोणताही वाद नसल्याचं म्हटलं आहे.