Coronavirus: महाराष्ट्रातील कोरोना विषाणूची परिस्थिती गंभीर, 36 पैकी 34 जिल्हे बाधित; उपाय योजनेबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा
महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे मंगळवार 5 मे रात्री 10 वाजेपर्यंत, राज्यात एकुण 15,525 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत
सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) बाबत महाराष्ट्र (Maharashtra) राज्याची स्थिती सर्वात वाईट आहे. महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे मंगळवार 5 मे रात्री 10 वाजेपर्यंत, राज्यात एकुण 15,525 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मागील 24 तासात 841 नवे कोरोनारुग्ण आढळले आहेत. अशा प्रकारे राज्यातील 36 पैकी 34 जिल्हे हे कोरोना विषाणू बाधित आहेत. खचितच ही चिंतेची बाब असल्याचे मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr Harsh Vardhan) यांनी व्यक्त केले आहे. आता याबात ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.
एएनआय ट्विट -
महाराष्ट्रातील कोरोना विषाणू स्थितीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, ‘महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती ही सध्या निश्चितच चिंतेची बाब आहे, कारण 36 पैकी 34 जिल्हे कोविड-19 मुळे बाधित आहेत. राज्यातील विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पुढील कारवाईची चर्चा करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेईन.’ महाराष्ट्रात राजधानी मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्य सरकार शक्यते प्रयत्न करीत आहे, मात्र अजूनही अनेक ठिकाणी नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. अशात आता केंद्र सरकार महाराष्ट्राची स्थिती सुधारण्यासाठी लक्ष घालणार आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी सांगितले की, कोविड-19 च्या समुदायाचा प्रसार रोखण्यासाठी भारत आतापर्यंत यशस्वी झाला आहे. त्याच वेळी हर्ष वर्धन यांनी आशा व्यक्त केली की, कोरोना विषाणूच्या संकटामुळे लोकांच्या सवयींमध्ये झालेला बदल हा साथीच्या आजाराच्या प्रतिबंधानंतर निरोगी समाजासाठी एक उत्तम मार्ग ठरेल. (हेही वाचा: Coronavrius: राज्यात आयसीयू बेड्सची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कराकडे विनंती)
दरम्यान, भारतात कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे जवळपास 50 हजाराच्या आसपास आहेत. बुधवारी सकाळी देशभरात कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 49,39 पर्यंत वाढली असून, त्यापैकी 1694 संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना विषाणूमुळे संसर्ग झालेल्यांपैकी 14,182 रुग्ण बरे झाले आहेत व घरी गेले आहेत.