Lockdown करण्याआधी जनतेला 3 दिवसांचा वेळ द्यावा, नीलम गो-हे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ऑक्सीजन पुरवठ्यासाठी प्रकल्प उभारण्यास आर्थिक तरतूद करायचा राज्य सरकारचा विचार स्वागतार्ह आहे असेही नीलम गो-हे (Neelam Gorhe) यांनी या पत्रात म्हटले आहे.

Neelam Gorhe and CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter, PTI)

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती पाहता लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) लॉकडाऊनची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये सामान्य नागरिक भरडला जाऊ नये तसेच ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी "लॉकडाऊन प्रत्यक्ष होण्याआधी जनतेला 3 दिवसांचा वेळ द्यावा" अशी विनंती करणारे पत्र शिवसेना नेत्या निलम गो-हे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. या काळात धान्य व दरडोई आर्थिक मदत मिळावी .ऑक्सीजन पुरवठ्यासाठी प्रकल्प उभारण्यास आर्थिक तरतूद करायचा राज्य सरकारचा विचार स्वागतार्ह आहे असेही नीलम गो-हे (Neelam Gorhe) यांनी या पत्रात म्हटले आहे.

"राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यापूर्वी जनतेला 3 दिवसांचा वेळ द्यावा. जेणेकरून गरजेच्या वस्तू घेण्यासाठी लोकांची गर्दी उसळणार नाही. आणि लॉकडाऊनचा उद्देश सफल होईल. तसेच बाराबलुतेदार, ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारने काहीतरी सोय करावी. तीन दिवसांमध्ये ज्यांना त्यांच्या घरी जायचे आहे त्यांची जाण्याची व्यवस्था करावी. त्यांना सूट द्यावी" अशी मागणी नीलम गो-हे यांनी केली आहे.हेदेखील वाचा- आजच्या बैठकीत काहींचे मत 2 आठवडे तर काहींचे 3 आठवड्यांचा लॉकडाऊन करण्यावर होते- अस्लम शेख

राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा सर्वांचाच विचार असून SOP आणि गाइडलाइन्सवर आजच्या टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याचे महाराष्ट्र मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत काहींचे मत 2 आठवडे तर काहींचे 3 आठवड्यांचा लॉकडाऊन करण्यावर होते असे महाराष्ट्राचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. मात्र उद्या मुख्यमंत्र्यांशी होणा-या बैठकीत लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.