IPL Auction 2025 Live

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता; रामदास आठवले यांचं खळबळजनक विधान

परंतु, अद्यापही राज्यात स्थिर सरकार राहणार का? असा प्रश्न आता जनतेला पडू लागला आहे. अशातच राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, असं खळबळजनक विधान सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

Ramdas Athawale | (Photo Credits-Facebook)

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर सत्ता स्थापनेचा तिढा सुटला. परंतु, अद्यापही राज्यात स्थिर सरकार राहणार का? असा प्रश्न आता जनतेला पडू लागला आहे. अशातच राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, असं खळबळजनक विधान सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले आहे. आजपासून नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. परंतु, या अधिवेशनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानाचे पडसाद उमटू लागले आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केले. या घटनेमुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. पंरतु, या युतीला राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पाठिंबा दिला नाही. त्यामुळे फडणवीस सरकार केवळ 80 तासांत कोसळले. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत सिद्ध करून सरकार स्थापन केले. मात्र, आता हे सरकार 5 वर्ष टिकणार का? स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीत फूट पडणार का? असा प्रश्न सर्वांना पडू लागला आहे. (हेहा वाचा - "महाराष्ट्रात पुढील 50 वर्षे महाविकास आघाडीचे सरकार कायम राहील"– उद्धव ठाकरे)

अशातच रामदास आठवले यांनी केलेल्या खळबळजनक विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 'महाराष्ट्रात हे 2 महिने भूकंपाचे आहेत. एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा भूकंप झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा झाला. आता कोणाचा होणार आहे, हे आपण पाहणार आहोत. परंतु, राज्यात पुन्हा कोणता ना कोणता भूकंप होण्याची शक्यता आहे,' असं आठवले यांनी म्हटलंय. तसेच राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी केलेले विधान शिवसेनेला सहन होत नसेल तर त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने स्थापन केलेले सरकार बरखास्त करावे आणि भाजपासोबत सत्ता स्थापन करावे, असा सल्लाही आठवले यांनी दिला.