BMC Fine Lalbaugcha Raja: मुंबई महापालिकेने लालबागचा राजा मंडळाला ठोठावला 3 लाख 66 हजारांचा दंड

लालबागचा राजा मंडळाने लाकडी खांब बसवण्यासाठी पदपथावर 53 आणि रस्त्यावर 150 खड्डे खोदले आले.

BMC, Lalbaugcha Raja (PC - Wikimedia Commons and PTI)

BMC Fine Lalbaugcha Raja: मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) मंडळाला मुंबई महापालिकेने (BMC) दणका दिला आहे. शहरात गणेशोत्सवादरम्यान लालबागचा राजा मंडळाकडून रस्ते आणि पदपथांवर खड्डे खोदण्यात आले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेने लालबागचा राजा मंडळाला 3 लाख 66 हजारांचा दंड ठोठावला आहे. लालबागचा राजा मंडळाने लाकडी खांब बसवण्यासाठी पदपथावर 53 आणि रस्त्यावर 150 खड्डे खोदले आले.

दरम्यान, दरवर्षी महानगरपालिका लालबागचा राजा गणेश मंडळाकडून रस्त्यावरील खड्ड्यांवरून दंड आकारत असते. मुंबईकर आधीच पावसामुळे झालेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेले असताना दुसरीकडे लालबागचा राजा मंडळाने रस्त्यावर खड्डे खोदून यात आणखी भर घातली आहे. त्यामुळे मंडळावर महापालिकेच्या वतीने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. (हेही वाचा - BMC Schools in Mumbai: मुंबईतील बीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता; तब्बल 11 टक्क्यांहून अधिक पदे रिक्त)

तथापी, मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनला यंदा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावर्षी बाप्पाच्या चरणी भरभरुन वस्तू दान करण्यात आल्या. गणेशोत्सवानंतर लालाबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून दान केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला. 1 कोटी 30 लाख रुपयांना लालबागच्या राजाच्या वस्तूंचा लिलाव झाला.

यावर्षी लालबागच्या राजाच्या दानपेटीत 10 दिवसांत तब्बल पाच कोटी रुपये दान जमा झाले होते. मात्र, यातील केवळ 14 किलो 433 ग्रॅम चांदी आणि 3 किलो 673 ग्रॅम सोन्याच्या वस्तू लिलावासाठी ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये मोदक, हार, फूल, मूर्ती, गदा, चैन अशा सोन्या-चांदीच्या वस्तूंचा समावेश होता.